मुलामुळे लागला आईच्या मारेकऱ्यांचा शोध.. जरे हत्याकांडातील तिघांना पोलिस कोठडी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

गाडीला कट मारल्याच्या कारणावरून आईशी वाद घालणाऱ्यांपैकी एकाचा फोटो मोबाईलमध्ये मुलाने काढला आणि त्याच फोटोच्या आधारे पोलिसांनी रेखा जरे हत्याकांडातील तिघांना पकडले. या तिघांनाही पारनेर पोलिसांनी ७ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, जरे हत्याकांड सुपारी देऊन झाले असल्याची चर्चा आहे. या सुपारीची साखळी खूप लांबवर पोहोचण्याची चिन्हे आहेत.

सोमवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात दुचाकी गाडीला कट मारल्यावरून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी पुण्याहून नगरला चारचाकी गाडीतून येत असलेल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या प्रमुख रेखा जरे यांच्याशी वादावादी केली व दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुपे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. जरे व हल्लेखोरांमध्ये वाद सुरू असताना गाडीत बसलेल्या जरे यांच्या मुलाने या हल्लेखोरांपैकी एकाचा फोटो मोबाईलमध्ये काढला होता. पोलिसांनी हाच फोटो व्हायरल करून या हल्लेखोराबद्दल कोणाला माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन केले होते. तसेच या हल्लेखोऱाचा स्वतंत्रपणे शोध घेण्यासाठी ५ पथकेही विविध ठिकाणी पाठवली होती. या पथकांच्या शोध मोहिमेला यश येऊन तीनजणांना पोलिसांनी अटक केली व त्यांना बुधवारी दुपारी पारनेर न्यायालयात हजर केले. तिघांनाही पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पकडण्यात आलेले तिघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असले तरी त्यांना हे कृत्य करण्याची सुपारी नगरमधीलच एका बड्या धेंडाने दिल्याचे सांगितले जाते. या धेंडाने केडगावमधील एकाला ही सुपारी दिली होती व त्या केडगाववाल्याने राहुरीतील एकाला ती दिली होती व त्याने या हल्लेखोरांना ती दिली होती, असे सांगितले जाते. पोलिसांकडून मात्र यासंदर्भात काहीही माहिती न देता आळीमिळी गुपचिळी पाळल्याने तोही चर्चेचा विषय झाला आहे. या साखळीची तड लागली तरच या गंभीर प्रकरणातील सर्व संबंधित आरोपी जेरबंद होण्याचा मार्ग मोकळा होईल असे चित्र आहे.

तिघांना आणले न्यायालयात
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या आरोपींमध्ये फिरोज राजू शेख (रा. संक्रापूर, आंबी, राहुरी), ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे (राहणार कडीत फत्तेबाद, श्रीरामपूर) व आदित्य सुधाकर चोळके (राहणार तिसगाव फाटा, कोल्हार, राहाता) यांचा समावेश आहे. त्यांना पारनेर न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीन आरोपींना अटक केल्यानंतर जरे खुनाच्या घटनेचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे. या प्रकरणात अजून अन्य नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे, मात्र, पोलिसांनी आरोपींची नावे अधिकृतपणे सांगितलेली नाहीत. पारनेर न्यायालयात सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मनीषा डुबे यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़. पोलीस तपासात या आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे़. सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहता परिसरात शोध घेतला. अटक केलेले दोघे कोल्हार येथील असून ते कोल्हार परिसरात लपून बसले होते. तर एक आरोपी कोल्हापूरच्या दिशेने फरार झाला होता. पोलीस या आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत. खुनाच्या घटनेबाबत गेल्या दोन दिवसापासून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांच्या हाती बऱ्यापैकी माहिती लागलेली आहे तसेच ज्या आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत, त्यांच्या फोनचे रेकॉर्ड सुद्धा पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जाते. जरे यांचा कोणाकोणाशी संपर्क झालेला आहे, त्याची माहिती पोलिसांनी घेतली असून दोनजणांची चौकशी करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांची नावे सांगण्यास पोलीस तयार नाहीत. दरम्यान, या हत्याकांडाची उकल काही प्रमाणात झाली असली तरी नेमक्या कोणत्या कारणाने जरे यांची हत्या केली गेली, याची माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. त्यामुळे पोलिस अन्य आरोपींचा शोध लागावा म्हणून ही माहिती देत नाहीत की काही दबावाने माहिती अधिकृतपणे दिली जात नाही, याच्या चर्चा सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post