जरे हत्याकांड : तपास 'स्कॉटलंड' वा 'एनआयए'कडे देण्याची उपरोधिक मागणी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या खुनाची सुपारी देणारा पत्रकार बाळ बोठे अजूनही सापडत नसल्याने या प्रकरणाचा तपास एकतर स्कॉटलंड पोलिसांकडे वा देशातील सक्षम अशा 'एनआयए' तपास यंत्रणेकडे दिला जावा, अशी मागणी येथील जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी केली आहे.

मुळे यांनी यासंदर्भात गृहमंत्री, पोलिस महासंचालक व पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. अहमदनगर येथे नुकत्याच घडलेल्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणाचा तपास आश्चर्यकारकरित्या पुढेच जात नसल्यामुळे या संपूर्ण घटनेचा तपास स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे तरी देण्यात यावा किंवा एनआयए कडे देण्यात यावा, अशी मागणी केली गेली आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, एखादी गरम घटना थंड करून त्यातील इंटरेस्ट संपवायचा प्रयत्न केला जातो आणि दरम्यानच्या काळात साक्षी-पुरावे, घटनाक्रम आणि संबंध याची जुळवाजुळव सोयिस्करपणे कायद्यामध्ये बसवून बेमालूमपणे अर्थपूर्ण पद्धतीने बडे गुन्हेगार यथावकाश निर्दोष सोडून दिले जातात, या गोष्टीला समाज आता खरेच विटला आहे. या सर्व पातळीवर लोकांच्या विस्मरणामध्ये जाण्याअगोदर जर या गुन्ह्यांचा प्रामाणिक छडा लावायचा असेल तर हा तपास एन.आय.ए.अर्थात नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सीकडे दिला तर बरे होईल, कारण आता सीआयडी आणि सीबीआय याबाबत देखील अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत आणि ते पण शक्य नसेल तर सध्याच्या तर ग्लोबलायझेशनच्या वाऱ्यामध्ये जगातील नंबर एक समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांकडे हा तपास द्यावा. कारण, तेथे तरी कमीत कमी या आरोपींचे "पाहुण्याचे मेव्हणे आणी मेव्हण्यांचे पाहुणे" असे नातेसंबंध जपून एकमेकांना खाल्लेल्या मिठाला जागून वाचवायचा प्रयत्न निश्चित करणार नाहीत. संपूर्ण समाजामध्ये याविषयी उलट-सुलट चर्चा चालू आहेत आणि न्याय व्यवस्था आणि प्रशासन यावरचा सामान्य जनतेचा विश्वासदेखील आता हळूहळू उडत चाललेला आहे, तो अगदी याच कारणास्तव घडण्याची भीती आहे. त्यामुळे येथील स्थानिक यंत्रणेकडून असे फरार आरोपी नाटकीपणामुळे सापडणारच नाही किंवा सापडून दिले जाणार नाहीत, असा दावा करून या पत्रात पुढे म्हटले आहे की, कारण, या निमित्ताने अनेक बड्या लोकांचे धागेदोरे पर्दाफाश होऊन समोर येण्याची शक्यता आहे आणि याच कारणास्तव फरार असल्यादरम्यान अशा आरोपीच्या जीविताला असलेला धोका पाहता, नंतर संबंधित बडे गुन्हेगार आयतेच सुटून जातील, म्हणून या गुन्ह्याचा तपास एन. आय. ए किंवा स्कॉटलंड पोलिसांकडे द्यावा, अशी आमची मागणी आहे, असे पत्रात नमूद केले गेले आहे. येत्या आठवड्यात हा सूत्रधार आरोपीला अटक करणे आवश्यक आहे, इतर माकडं धरणे महत्त्वाचं नाही तर मदारी धरला पाहिजे. असे न झाल्यास सर्व महिला संघटनांनाबरोबर घेऊन उच्च न्यायालया मध्ये याविषयी दाद मागितली जाईल, असा इशाराही पत्रात दिला गेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post