गरम पाण्याने स्नान केल्यास शांत झोप!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रात्री झोपण्याच्या तीन तास आधी ४१ अंश सेल्सियस तापमानाच्या गरम पाण्याने स्नान केल्यास झोप चांगली लागते असे एका अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकेतील ऑस्टिन विद्यापीठाच्या संशोधकांनी एकून ५३२२ अभ्यासांचे एकत्रित निरीक्षण करून हा निष्कर्ष काढला आहे. पाण्याचे तापमान जर ४० ते ४३ अंश सेल्सियस असेल तर झोप चांगली लागते असे त्यांचे म्हणणे आहे.

जर झोपण्याच्या एक ते तीन तास अगोदर स्नान केले तर झोप लवकर लागण्याची शक्यताही वाढते. साधारण सरासरी दहा मिनिटे झोप लवकर लागते असाही दावा करण्यात आला आहे. हे संशोधन ‘स्लीप मेडिसिन रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. पाण्याच्या मदतीने अंग शेकणे व झोप यांचा संबंध असल्याचे आतापर्यंत बऱ्याच वेळा सांगण्यात आले आहे.

झोप व आपल्या शरीराचे जैविक घडय़ाळ यांचा जवळचा संबंध आहे हे आधीच स्पष्ट झालेले असून २४ तासांचे जैविक प्रक्रियांचे संकेत हे मेंदूतील हायपोथॅलमस या भागात असलेल्या जैविक घडय़ाळात नोंदलेले असतात. त्यानुसार आपल्याला आता उठायची वेळ झाली आहे, आता झोपण्याची वेळ आहे याचे इशारे मिळत असतात.

शरीराचे तापमान या घडय़ाळात महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. शरीराचे तापमान झोपेत कमी असते व ते दुपारी किंवा सायंकाळी जास्त असते. जैविक घडय़ाळ्यानुसार शरीराचे तापमान झोपण्याच्या एक तास अगोदर ०.५ ते १ फॅरनहीटने कमी होते. रात्री ते आणखी कमी होते. नंतर झोपेच्या उत्तरार्धात शरीराचे तापमान वाढते, त्यामुळे जागे होण्याचे संकेत मिळतात. जर झोप चांगली यायची असेल तर झोपण्याच्या तीन तास आधी गरम पाण्याने स्नान करणे फायद्याचे आहे. यामुळे झोप लवकर लागते, एवढेच नव्हे तर त्याचा दर्जाही सुधारतो.

Post a Comment

Previous Post Next Post