..नाही तर 'त्यांना' मिळणार कांद्याचा 'प्रसाद'; शेतकरी संघटना झाली आक्रमक

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कांद्यावरील निर्यातबंदी न उठविल्यास भाजप खासदारांना कांदे मारा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे, त्यानंतर १ जानेवारीपासून भाजप खासदारांना कांद्यांचा प्रसाद देण्याचे नियोजन आहे. निर्यात बंदीनंतर कांद्याचे भाव पडले आहेत. त्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकरी भाजपच्या खासदारांना कांदे मारण्याचे आंदोलन करतील, असा निर्णय श्रीगोंदा येथे झालेल्या नगर व पुणे जिल्ह्याच्या संयुक्त बैटकीत करण्यात आला असल्याचेही घनवट यांनी सांगितले.

शेतकरी संघटनेचे प्रणेते (स्व.) शरद जोशी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त श्रीगोंद्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या होत असलेल्या नुकसानीवर चर्चा झाली. कांद्याचे ठोक विक्री दर ६० रुपये किलोच्या पुढे गेल्यानंतर केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली, कांदा साठ्यांवर मर्यादा घातली, परदेशातून कांदा आयात केला व व्यापार्‍यांवर छापे टाकून कांद्याचे दर पाडले आहेत. पण, अनेक शेतकर्‍यांकडे अद्यापही साठवलेला कांदा आहे. डिसेंबरअखेर व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नवीन कांदा बाजारात यायला सुरुवात होते. हा कांदा बाजारात आल्यानंतर आणखी दर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे, कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करून केंद्र शासनाने तातडीने कांदा निर्यात बंदी कायमची उठविण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत कांदा निर्यातबंदी न हटविल्यास १ जानेवारीपासून कांदा उत्पादक शेतकरी दिसतील तेथे भाजपच्या खासदारांना कांदा मारण्याचे आंदोलन करतील, असा निर्णय या बैठकीत करण्यात आला.

दिवसा वीजपुरवठा मागणी
कांद्याच्या प्रश्नाबरोबरच दिवसा वीज पुरवठा, ऊस दर, दूध दर, वन्य प्राण्यांचा त्रास, साखर कारखान्यातील काटामारी, साखर उतारा चोरी, बाजार समित्यांमधील लूट आदी विषयांवर बैठकीत चर्चा झाली. उसाची काटामारी रोखण्यासाठी बाहेरच्या दोन काट्यांवर वजन करून फरक दाखवून साखर कारखान्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे. दुधातील भेसळीला आळा घालण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यात येइल. बाजार समित्यांमध्ये अद्यापही सुरु असलेल्या गैरव्यवहारांचे पुरावे जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांच्याकडे लेखी तक्रारी करून संबंधित सचिव व संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. बैठकीस पश्चिम महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल चव्हाण, प.महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमा नरोडे उपस्थित होत्या. दरम्यान, या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली. शेतकरी संघटनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदावर संगमनेरचे मधुकर शिंदे, नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदावर विक्रम शेळके, नेवासा तालुका अध्यक्षपदावर कुलदीप देशमुख, श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदावर पोपट झगडे, श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष पदावर बाळासाहेब सातव यांची तसेच पुणे जिल्हाध्यक्षपदावर लक्ष्मण रांजणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post