घोरण्यामुळे त्रस्त आहात?; तर मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

दिवसभर धावपळ केल्यानंतर शरीरात प्रचंड थकवा जाणवतो. त्यामुळे बऱ्याचदा रात्री झोपल्यानंतर आपल्याला लगेच गाढ झोप लागते. परंतु अनेकांना झोपल्यानंतर घोरण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचीही झोप नीट होत नाही आणि इतरांनाही या घोरण्याचा त्रास होतो. मात्र त्यावर नेमके काय करावे हे आपल्याला काही केल्या समजत नाही. इतरांच्याही झोपेचे आपल्या घोरण्याने खोबरं होत असते. एकतर घोरण्याने झोप लागत नाही आणि एकदा लागली की या लोकांचे घोरणे पुन्हा सुरु होते. मग पुन्हा झोपमोड. असे सातत्याने झाल्याने शेवटी झोप होतच नाही. मग चिडचिड होत राहते आणि यावर काय करावे ते मात्र शेवटपर्यंत कळत नाही. मात्र हे घोरणे काही प्रमाणात कमी व्हावे काही खास टिप्स…

१. वजन कमी करा –

वाढतं वजनदेखील घोरण्याचं एक कारण असं शकतं. वजन वाढलं की सहाजिकच शरीरावरील चरबीदेखील वाढते. ही अतिरिक्त चरबी गळ्याभोवतीही जमा होत असते. त्यामुळे बऱ्याच वेळा रात्री झोपल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो. चरबी वाढल्यामुळे गळ्यावाटे शरीरात जाणाऱ्या हवेत अडथळा निर्माण होतो आणि गळ्यात कंपनं निर्माण होतात.

२. दारु आणि सिगारेट टाळा

जर तुम्हाला दारु आणि सिगारेटचे व्यसन असेल तर घोरण्याची समस्या उद्भवू शकते. हे व्यसन एकदब बंद कऱणे काहींना अवघड जाऊ शकते. मात्र आपल्यामुळे कुटुंबातील इतरांना त्रास होऊ नये म्हणून ही व्यसने करणे हळूहळू कमी करा.

३. व्यवस्थित झोप घ्या –

पाठीवर झोपल्यामुळे हनुवटीखालील चरबीयुक्त घटकांमुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि व्यक्ती घोरायला लागते. अशा लोकांनी एका कुशीवर झोपावे. यामुळे घोरण्याचे प्रमाण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. तसंच झोप ही योग्य प्रमाणातही झाली पाहिजे. आपल्या शरीराला ७-८ तास झोपेची आवश्यकता असते.

४. व्यायाम करणे आवश्यक –

घोरण्याची समस्या कमी करायची असल्यास नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. यामध्ये धावणे, पोहणे, सायकलिंग, अॅरोबिक्स, डान्स यांचा समावेश असावा.

५. आहारात बदल करणे –

आहारात मीठ, साखर यांचे प्रमाण कमी करणे, पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करणे. फळे, भाज्या यांचे आहारातील प्रमाण समतोल ठेवणे गरजेचे आहे. एकावेळी कमी प्रमाणात पण जास्त वेळा खा.

Post a Comment

Previous Post Next Post