पुरुषांपेक्षा जास्त साखर खातात महिला


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारतात महानगरांमधील महिलांचे, विशेषत: मुंबईतील महिलांचे साखरेच्या सेवनाचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत अधिक असल्याचे नुकत्याच केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे. या पाहणीनुसार, साखर सेवनाचे सरासरी प्रमाण हे हैदराबाद शहरात सर्वात कमी आहे. हे प्रमाण दरमाणशी दरदिवशी सरासरी किती ग्रॅम साखर सेवन केली गेली, यावर निश्चित केले जाते.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्टिटय़ूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन) यांच्यातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. ‘आयसीएमआर’च्या निकषानुसार दरमाणशी दरदिवशी साखरेच्या सेवनाचे प्रमाण हे ३० ग्रॅमच्या आत असले पाहिजे. सर्व महानगरांचा विचार करता सर्वेक्षणात हे प्रमाण या मर्यादेपेक्षाही कमी म्हणजे १९.५ ग्रॅम प्रतिमाणशी इतके असल्याचे दिसून आले. ‘इंटरनॅशनल लाइफ सायन्सेस इन्स्टिटय़ूट (आयएलएसआय)- इंडिया’ हे या सर्वेक्षणाचे प्रायोजक होते. राष्ट्रीय पोषण नियामक संस्थेने प्रमुख राज्यांतील १६ शहरांतील नागरिकांची आहारविषयक माहिती तपासून हा निष्कर्ष काढला आहे.

मुंबई आणि अहमदाबाद या शहरांतील लोकसंख्येचा विचार करता मुंबईत साखरेच्या सेवनाचे सरासरी प्रमाण हे २६.३ ग्रॅम प्रतिदिन, तर अहमदाबादमध्ये हेच प्रमाण २५.९ ग्रॅम प्रतिदिन इतके आढळून आले. दिल्ली, बंगळूरु, कोलकाता आणि चेन्नई या शहरांच्या तुलनेत मुंबई आणि अहमदाबादमधील साखर सेवनाचे प्रमाण हे कितीतरी जास्त आहे. दिल्लीत हे प्रमाण २३.२ ग्रॅम प्रतिदिन, तर बंगळूरु- १९.३, कोलकाता-१७.१, चेन्नई- १६.१ (ग्रॅम प्रतिदिन) इतके आहे. ‘आयएलएसआय’चे अध्यक्ष पी. के. सेठ यांनी ही माहिती दिली. सर्वसाधारणपणे साखर सेवनाचे महिलांमधील सरासरी प्रमाण हे २०.२ ग्रॅम प्रतिमाणशी प्रतिदिन, तर पुरुषांमधील हेच प्रमाण २४.४ ग्रॅम प्रतिमाणशी प्रतिदिन इतके आहे. मुंबईचा विचार करता महिलांमधील हे प्रमाण २८ ग्रॅम, तर पुरुषांमधील प्रमाण २४.४ ग्रॅम प्रतिदिन आहे. देशात सर्व राज्यांत अतिरिक्त साखरेतून ऊर्जा मिळण्याचे प्रमाण सरासरी ५.१ टक्के, तर मुंबईत हे प्रमाण सर्वाधिक ६.६ टक्के असल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

Previous Post Next Post