‘टॉन्सिल्स’ म्हणजे नेमकं काय?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

टॉन्सिल्स म्हणजे घशात असलेल्या लसिका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल्समुळे श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे रोगकारक संक्रमणापासून संरक्षण होते. परंतु त्यांनाच जेव्हा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ लागतो, तेव्हा त्यांचे गृहीत कार्य नाहीसे होते आणि प्रतिजैविके देऊन त्यांचेच संरक्षण करण्याची वेळ येते. अन्यथा शरीरावर अपायकारक परिणाम होऊ लागतात.

‘डॉक्टर, याचा घसा वरचेवर दुखतो, सर्दी, खोकला, अन् तापही येतो.’ 

‘डॉक्टर, टॉन्सिल्स काढल्याने हिची उंची वाढेल का हो?’

‘आज काल टॉन्सिल्स काढू नये म्हणतात, ते बरोबर आहे का?’

या आणि अशा अनेक सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे देण्याआधी टॉन्सिल्सविषयी शास्त्रीय माहिती घेऊ .

टॉन्सिल्स (गलवाताम) म्हणजे घशात असलेल्या लसिका ग्रंथींचा एक समूह. घशात जिभेमागे (पॅलेटाइन टॉन्सिल्स – तालु गिलायू), नाकामागे (अ‍ॅडेलॉइड्स- ग्रसनी गिलायू) व जिभेवर (लिंग्वल टॉन्सिल्स – जिव्हा गिलायू) टॉन्सिल्स असतात. या सर्वानी मिळून वर्तुळाकार वाल्डेयर्ल्स रिंग (Waldeyerls ring) बनते. पांढऱ्या संरक्षक पेशींचे हे गठ्ठे. परंतु त्यांनाच जेव्हा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ लागतो, तेव्हा त्यांची गृहीत कार्य करण्याची क्षमता संपते आणि प्रतिजैविके देऊन त्यांचेच संरक्षण करण्याची वेळ येते. अन्यथा शरीरावर अपायकारक परिणाम होऊ लागतात.

टॉन्सिल्समुळे श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे रोगकारक संक्रमणापासून संरक्षण होते. टॉन्सिल्स लसिकाभ नावांच्या ऊतींपासून बनलेले असतात. या ऊतींपासून रक्तातील पांढऱ्या पेशींची (लसिका पेशींची) निर्मिती होत असते. या पेशी संक्रमणाचा प्रतिकार करतात. उदाहरणार्थ, जेव्हा शरीरावर जिवाणू किंवा विषाणूंचे संक्रमण होते तेव्हा लसिका पेशी त्यांचा नाश करतात तालू टॉन्सिल्सवर अनेक खळगे असतात. जिवाणू आणि अन्नकण या खळग्यांमध्ये अडकले जातात.

शरीरात टॉन्सिल्सचे महत्त्व ६-१० वर्षांपर्यंत असते. तोपर्यंत प्रतिकार शक्तिकरिताचे बाकी अवयव विकसित होतात. मुले जशी वयाने वाढतात तसे त्यांच्या टॉन्सिल्सचा आकार लहान होतो. श्वसनमार्गातील सूक्ष्मजीवांना प्रतिकार करताना टॉन्सिल्सच्या पृष्ठभागावरील खळग्यांत सूक्ष्मजीवांचा शिरकाव झाल्यास त्यात पू होऊ शकतो. काही वेळा संक्रमणामुळे टॉन्सिल्सदाह होतो आणि त्या सुजतात. वेदना दूर करण्यासाठी विश्रांती, मिठाच्या गुळण्या, वेदनाशामक गोळ्या दिल्या जातात. जिवाणूंचे संक्रमण असल्यास प्रतिजैविके देतात. मात्र विषाणूंचे संक्रमण झाल्यास टॉन्सिल्सशोथावर (अ‍ॅक्युट टॉन्सिलिटीस) प्रतिजैविकांचा काही उपयोग होत नाही. सामान्यपणे १०-४० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.

लक्षणे : १. तीव्र टॉन्सिल्सशोथामध्ये एकाएकी थंडी वाजून ताप भरतो. २. घसा दुखू लागल्याने गिळण्यास त्रास होतो. ३. सर्दी, खोकला येतो. ४. अरुची, अस्वस्थपणा वगैरे लक्षणेही दिसतात. ५. जबडय़ाच्या हाडामागे अवधानाच्या गाठी (लिम्फ नोड्स) वाढतात. ६. ग्रसनी टॉन्सिल्स (अ‍ॅडेनॉइड्स) वाढल्याने वा त्यांच्या शोथाने झोपताना श्वास घेण्यास अडथळा येतो. नाक बंद राहिल्याने टाळा वर उचलला जातो. नाक बसते व दात पुढे येऊ लागतात. ७. श्वासास दरुगधी येऊ लागते. ८. कान दुखतो वा फुटतो.

तपासणी : १. तोंड उघडून पाहिल्यास दोन्ही बाजूंच्या टॉन्सिल्सचा रंग लालभडक दिसतो. २. त्यांचे आकारमानही मोठे झालेले असते. ३. तीव्र शोथात गिलायूंवर चिकट पांढरा असा साखा जमतो. ४. चिरकारी शोथाचा (क्रॉनिक टॉन्सिल्स) आकार मोठा वा छोटा असू शकतो. टॉन्सिल्सपुढील व मागील स्नायू लालसर दिसतात व मानेत अवधानाच्या गाठी असतात. कधी कधी टॉन्सिल्समध्ये पू भरून फोड तयार होतो. त्याला टॉन्सिल्स गळू (टॉन्सिल्सर अ‍ॅब्सेस) म्हणतात.

टॉन्सिल्स किंवा ग्रसनी टॉन्सिल्स सुजल्यामुळे झोपताना श्वास घेण्यास अडथळा येतो आणि गिळताना किंवा बोलताना कधी कधी त्रास होऊ शकतो. ग्रसनी आणि कान यांना जोडणाऱ्या ग्रसनी कर्णनलिकेचे (तोंड, नाक, घसा व कानाचा पडदा यांमध्ये संबंध प्रस्थापित करणाऱ्या नलिकेचे) ग्रसनीमधील तोंड बंद होऊन मध्यकर्णाला सूज येऊन कान दुखतो, कधी फुटतो. मग महत्त्वाचा प्रश्न येतो, टॉन्सिल्स केव्हा काढावे? आता खूप उत्तम प्रतिजैविके उपलब्ध आहेत. ती घेऊनदेखील काही व्यक्तींना वारंवार टॉन्सिल्सचा त्रास होतो. वर्षांतून ३ वेळा असे ३ वर्षे, वर्षांतून ५ वेळा असे २ वर्षे किंवा वर्षांतून ६ पेक्षा जास्त वेळा असे १ वर्ष होत असल्यास तज्ज्ञ टॉन्सिल्स काढून टाकण्याचा सल्ला देतात आणि शस्त्रक्रियेने ती काढून टाकतात.

मुलांची उंची वाढत नसल्यास त्याचे कारण पुन:पुन्हा होणारे जंतुसंसर्ग असे असू शकते. नाकामागच्या ग्रसनीच्या सुजेमुळे श्वसनास जो अडथळा होतो, त्यामुळे दर श्वासात कमी प्राणवायू फुप्फुसात पोहोचतो, तसेच हवा सायनसेसमध्ये न खेळल्याने कमी शुद्ध असते. त्यामुळे वाढ खुंटू शकते. अशा वेळी शस्त्रक्रियेने दोन्ही प्रकारच्या गाठी काढाव्या.

टॉन्सिल्स गळू पूर्ण बरे न झाल्यास वा वारंवार झाल्यास टॉन्सिल्स काढावे. घसादुखी, ताप, सर्दी, खोकल्यानंतर कान फुटण्याचा त्रास होऊ लागल्यास मुख्यत्वे ग्रसनी टॉन्सिल्स काढावे लागतात.

टॉन्सिल्समध्ये काही विजातीय पदार्थ अडकून त्रास होऊ लागल्यास तसेच काही वेळा टय़ूमर, सिस्ट (उबाळू) वा कर्करोग अपेक्षित असल्यास टॉन्सिल्स काढून तपासणीसाठी पाठवले जातात.

आजकाल वाढीस लागलेली आणखी एक समस्या म्हणजे घोरण्याची व त्यामुळे श्वास रोखला जाण्याची. याची अनेक कारणे आहेत परंतु ते टॉन्सिल्स वा ग्रसनी टॉन्सिल्समुळे असल्यास शस्त्रक्रिया करावी लागते. टॉन्सिल्समुळे शरीरावर दुष्परिणाम होत असल्यास शस्त्रक्रिया करावी.

साधारण ६ ते ८ वर्षे वयानंतर टॉन्सिल्स काढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीस कसलाही अपाय होत नाही. श्वसनास वा गिळण्यास होणारा त्रास अति झाल्यास अगदी २ वर्षे वयातही शस्त्रक्रिया करता येते. शक्यतो तज्ज्ञदेखील ती टाळतात.

दुष्परिणाम : तीव्र गिलायुशोथ अनेक प्रकारच्या जंतूंमुळे होऊ शकतो. त्यांपैकी घटसर्प, स्ट्रेप्टोकॉकस जंतू हे विशेष महत्त्वाचे आहेत. स्ट्रेप्टोकॉकस जंतूमुळे होणाऱ्या संसर्गातून शरीरातील इतर इंद्रियांवरही परिणाम होतो. संधिवात, हृदयरोग, मूत्रपिंडाला सूज येणे इ. उपद्रवांचा परिणाम सर्व जन्मभर होऊ शकत असल्यामुळे वारंवार तपासणी व बराच काळ उपचार घ्यावे लागतात. टॉन्सिल्स काढून टाकण्याची शस्त्रक्रिया हा जास्त योग्य उपचार ठरतो.

टॉन्सिल्स व ग्रसनी टॉन्सिल्सची शस्त्रक्रिया – शस्त्रक्रियेपूर्वी लागणाऱ्या रक्त, लघवी, क्ष-किरण तपासण्या झाल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे, शस्त्रक्रियेकरीता उपाशीपोटी दाखल होणे आवश्यक असते. आपण निवडलेले डॉक्टर जबाबदार व त्यांच्या क्षेत्रात तज्ज्ञ (कान-नाक-घसा तज्ज्ञ) असणे महत्त्वाचे. ही शस्त्रक्रिया डॉक्टर्स व रुग्ण दोघांनीही किरकोळीत घेऊ नये.

‘कॉबलेशन टॉन्सिलेक्टोमी’चे फायदे

प्रगत तंत्रज्ञानाचे फायदे आपण दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षेत्रातच अनुभवत असतो. शस्त्रक्रियेबाबतही आपल्याला याची माहिती हवी. या पद्धतीत आयोनाईज्ड सलाइन वापरून रेडिओ-फ्रिक्वेन्सीने रेणूंचे विघटन केले जाते व टॉन्सिल्स अलगदपणे बाजूला केली जाते. तंत्रज्ञानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे या पद्धतीत ४ थेंबही रक्तस्राव होत नाही! त्याव्यतिरिक्त कमी दुखणे, कमी काळजी घ्यावी लागणे हे फायदे असतात. अर्थात कुठल्याही चांगल्या गोष्टीची पडते, तशीच या पद्धतीची किंमतही जास्त असतेच. कारण हे तंत्रज्ञान, मशीनही महाग असते व ऑपरेशनकरिता लागणारी त्याची कांडीही. लोकांचा आता आपल्या लाडक्या मुला-मुलींना त्रास होऊ नये म्हणून, कॉबलेशन ऑपरेशनने टॉन्सिल्स व ग्रसनी टॉन्सिल्स काढून घेण्याकडे कल दिसून येतो.

ऑपरेशनमधील धोके व ऑपरेशन नंतर

कान-नाक-घसा तज्ज्ञ ऑपरेशन करताना योग्य काळजी घेतातच परंतु भुलीचे, रक्तस्रावाचे, जंतू-संसर्गाचे धोके लक्षात ठेवावेच लागतात. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असते. गरम, बोचतील असे कडक, तळकट, आंबट, तिखट पदार्थ ८-१० दिवस वज्र्य करावेत. गुळण्या करून घसा स्वच्छ ठेवणे, औषधे घेणे, बोलावल्यानुसार तपासणीस जाणे गरजेचे असते. आणि हो, टॉन्सिल्स काढले असो वा नसो, उघडय़ावरील, पदपथावरील, टपऱ्यांवरील पदार्थ खाण्याची हौस, मग ते भेळ-पाणीपुरी असो की चायनीज, शरीरास घातकच! – मुख्यत्वे त्यातील चटण्या, चिंच-पाणी, सॉस व पदार्थ बनवणाऱ्या हातांची – स्वच्छता! तेव्हा ते टाळावे हे उत्तम.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार किंवा उपाय करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post