भिजवलेले बदाम आणि गर्भाची योग्य वाढ! वाचा फायदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सुकामेवा म्हटलं की डोळ्यासमोर काजू,बदाम, पिस्ता,अक्रोड, मनुके असं बरंच काही येतं. अगदी अबाल-वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच आवडणाऱ्या या सुक्यामेव्यामध्ये काजू आणि बदाम आवडीने खाल्ले जातात. मात्र काजू-बदाम योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा शरीरासाठी फायदा होतो. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती वाढतेहा एकच फायदा आपल्याला माहित होता. मात्र बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे भिजवलेले बदाम खाल्ले तर ते गर्भवती महिलांसाठीही उपयुक्त आहेत.

बदामात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक घटक असतात. तसंच त्यामध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक, ओमेगा ३, फॅटी अ‍ॅसिड देखील असतात. त्यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. पण हे सारे गुणधर्म शरीरात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी त्यांना रात्रभर पाण्यात भिजवणे फार गरजेचे आहे. बदामाच्या सालींमध्ये असणार्‍या काही घटकांमुळे त्याचे पचन होणे कठीण होते. म्हणूनच बदाम रात्रभर भिजत ठेवा. यामुळे बाहेरील आवरण मऊ होते व शरीराला बदामांतून अधिकाधिक पोषण मिळण्यास मदत होते. पाहूयात काय आहेत भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे…

१. पचनशक्ती सुधारण्यास मदत
भिजवलेले बदाम खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. भिजवलेल्या बदामाच्या सालींमध्ये असणारी एन्जाईम्समुळे शरीरातील मेद कमी करण्यास मदत होते. परिणामी पचनशक्ती सुधारते.

२. गर्भाची योग्यरित्या वाढ होण्यास मदत होते
महिलांनी प्रेग्नंसीच्या काळात स्वत:कडे आणि बाळाच्या वाढीकडे पूर्ण लक्ष देण्याची विशेष गरज असते. त्यामुळे तिच्या आहार पौष्टिक आणि सकस पदार्थांचा समावेश असणं आवश्यक आहे. गरोदर असताना स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खावेत. गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्या आणि गर्भाच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असते. बदामातील फॉलिक अ‍ॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ होण्यात मदत होते.

३. रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवते
धकाधकीच्या जीवनात अनेकांना रक्तदाबाची समस्या निर्माण होते. अशा व्यक्तींनी दररोज भिजवलेले बदाम खावेत. भिजवलेल्या बदामामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. ‘जर्नल ऑफ फ्री रॅडीकल रिसर्च’नुसार बदामातील ‘अल्फा टेकोफेरॉल्स’ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदाम खाल्ल्यास नैसर्गिकरित्या रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

४. हृदयाचे कार्य सुधारते
जर्नल ऑफ न्युट्रीशनच्या अहवालानुसार, बदामातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो. त्यामुळे आहारात बदामांचा समावेश अवश्य करावा.

५. वजन घटवण्यास मदत होते
बदलती जीवनशैली आणि फास्टफूड खाण्याची सवय यामुळे अनेक जण वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा व्यक्तींनी भजवलेले बदाम खावेत. बदामात कॅलरी कमी असल्याने त्याचा आहारात समावेश करावा. बदामामुळे पचन सुधारते, वारंवार लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळते तसेच लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण असलेल्या मेटॅबॉलिक सिंड्रोमवरही नियंत्रण मिळते.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post