एकत्र असणे व हसण्याची किंमत आम्हाला मोजावी लागेल.. 'त्यांच्या' मिश्किल टिपणीने उडाला हास्यकल्लोळ


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

'पवार व विखेंनी एकत्र शेजारी-शेजारी बसणे, गप्पाष्टक करणे व हसणे ही विशेष गोष्ट घडली आहे व तिची किंमत आम्हाला मोजावी लागेल'....अशी मिश्किल टिपणी नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आणि जोरदार हास्यकल्लोळ उडाला. ठिकाण होते-टीव्ही चॅनेलवरील 'चला, हवा येऊ द्या' कार्यक्रमाचे. पण यातून राज्याच्या राजकारणातील पवार-विखे संबंधांतील कटुतेवर प्रकाश मात्र पडला व तोच आता राज्याच्या राजकारणातही पुन्हा चर्चेत आहे.

टीव्हीवरील 'चला, हवा येऊ द्या' या प्रसिद्ध कार्यक्रमात नुकतेच नगर जिल्ह्याशी संबंधित तीन राजकीय नेते सहभागी झाले होते. नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे, मूळचे बारामतीचे असलेले पण नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार असलेले रोहित पवार तसेच मूळच्या परळीच्या असल्या तरी नगर जिल्ह्यातील पाथर्डीला मावशी मानणाऱ्या भाजपच्या पंकजा मुंडे यांनी या कार्य़क्रमात सहभाग घेऊन धमाल उडवून दिली. अभिनेते स्वप्निल जोशी व सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांनी या तिघांनाही बोलते केले. त्यांनीही आपल्या राजकीय व सामाजिक जीवनाची माहिती दिली. वैयक्तिक आवडीनिवडी, लहानपणाची स्वप्ने, कौटुंबिक वातावरण, घरातील वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन यावरही मनमोकळी मते व्यक्त केली. यानिमित्ताने ऊस तो़डणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक राजकीय नेत्याने किमान अशी पाच कुटुंबे दत्तक घेतली तरी खूप काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करताना या कामासाठी पंकजा वा रोहित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचीही तयारी डॉ. सुजय यांनी दाखवून दाद मिळवली.

'त्या' वाक्याने मिळवल्या टाळ्या

पवार व विखेंना (डॉ. सुजय व रोहित) एकत्र व शेजारी-शेजारी बसवून त्यांच्यात हास्यकल्लोळ रंगवण्याची किमया 'चला, हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने साधल्याची टिपणी डॉ. सुजयने करताच हास्यकल्लोळ उडाला. रोहित यांचे आजोबा व महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि डॉ. सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे यांच्या परस्पर विऱोधाच्या राजकारणाची माहिती राज्यभराला आहे व त्याचाच संदर्भ या वाक्याच्या मागे असल्याने राजकारण प्रेमींकडून त्याला हास्यकल्लोळाची दाद मिळाली. दीड वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी नगर दक्षिण मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडण्यास नकार दिला होता, त्यावेळी रोहित पवारांनी डॉ. सुजय यांची लोणीत भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादीत प्रवेशाचे आमंत्रण दिले होते., असे सांगतात. पण नंतर शरद पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला व ते निवडून आले. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय व रोहित यांनी एकत्रित शेजारी-शेजारी बसणे व गप्पाष्टक करताना हास्यकल्लोळात सामील होणे राज्यातील पवार-विखे यांच्यातील राजकीय संबंधांच्या अनुषंगाने विशेष असल्याची डॉ. सुजय यांची टिपणी हास्यकल्लोळाची दाद मिळवून गेली. काँग्रेसमधून भाजप प्रवेश करताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या वडिलांचे (राधाकृष्ण विखे) विरोधी पक्ष नेते पद व काँग्रेसमध्ये असलेल्या आई शालिनीताई विखे यांचे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पणाला लावले होते, लोकसभा निवडणुकीत अपयश आले असते तर परिवाराचे राजकीय अस्तित्व संपण्याची शक्यता होती, अशी डॉ. सुजय यांनी व्यक्त केलेली भावनाही त्या काळात रंगलेले राजकारण किती भयानक होते, याची जाणीव करून देणारे ठरले. दरम्यान, या मनोरंजनात्मक कार्यक्रमात लाकडी रिंगने वस्तू मिळवण्याच्या स्पर्धेत डॉ. सुजय यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी फेकलेली रिंग खेळण्यातील घड्याळावर पडली व त्यांनी ते हातात घेऊन डॉ. सुजयला देऊ केल्यावर 'घड्याळ' हे राष्ट्रवादीचे चिन्ह असल्याने त्यांनी कोपरापासून जोडलेले हातही हास्यकल्लोळ उडवून गेले तसेच पंकजांनी रोहित यांना 'माझी माणसे फोडू नका' म्हणून केलेले मिश्किल भाष्यही दाद मिळवणारे ठरले.

Post a Comment

Previous Post Next Post