शिर्डी : महिला बेपत्ता प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शिर्डीतून बेपत्ता झालेली महिला साडेतीन वर्षांनी सापडल्याचे वृत्त सध्या विविध माध्यमांतून चर्चेत आहे. त्या महिलेला त्यावेळी घडलेल्या घटनांबाबत आता काही आठवत नाही. पण जे आठवतेय, त्यावरून अनुमान लावले असता तिच्या बेपत्ता होण्यापासून आतापर्यंतच्या काळातील अस्तित्वाबाबत निर्माण होत असलेल्या विविध प्रश्नांची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. अर्थात यासाठी त्या महिलेने व तिच्या कुटुंबाने साथ देणे गरजेचे आहे. पण या महिलेच्या बेपत्ता झाल्यानंतर शिर्डी हे मानवी तस्करीचे वा मानवी अवयव तस्करीचे केंद्र झाल्याची चर्चा झाली होती. त्या चर्चेत तथ्य होते की नव्हते, याचा शोध पोलिसांना आता त्या महिलेशी संवाद साधूनच घ्यावा लागणार आहे. तो घेतला तरच शिर्डीतील गुन्हेगारी खरेच गंभीर आहे काय, याचेही स्पष्टीकरण होणार आहे.

नगर जिल्ह्यातील शिर्डी गाव साईसमाधी मंदिरामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. देशविदेशातून भाविक येथे साईसमाधी दर्शनासाठी येतात. या भाविकांमध्ये हौशे-नवशे व गवशेही असतात. वाहने-पॉकेट-दागिने चोरी, खून, मारामाऱ्या, आत्महत्या, फसवणूक अशी गुन्हेगारीही शिर्डीत वाढली आहे. यात बहुतांश परप्रांतियांचा संबंध असतो. अशा स्थितीत १० ऑगस्ट २०१७ रोजी दीप्ती सोनी नावाची इंदोर येथील महिला शिर्डीतून अचानक बेपत्ता होते व साडेतीन वर्षांनी म्हणजे १७ डिसेंबर २०२० रोजी पुन्हा इंदोरमध्येच सापडते, या मागचे गुढ उकलण्याची गरज आहे. ही महिला बेपत्ता झाल्यानंतर तिच्या शोधासाठी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली गेली होती. त्यावेळी पोलिसांनी दिलेल्या अहवालावर नाराजी व्यक्त करीत पोलिस महासंचालकांनी या प्रकरणाच्या तपासात लक्ष घालावे तसेच शिर्डीमध्ये मानवी तस्करीचे वा मानवी अवयवांच्या तस्करीचे रॅकेट कार्यरत आहे काय, याचा शोध घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतरच शिर्डीमध्ये अन्य विविध प्रकारच्या गुन्हेगारीबरोबरच मानवी तस्करी व मानवी अवयव तस्करीही होते काय, असे सवाल उपस्थित झाले होते व साईबाबांच्या शिर्डीतील ही गंभीर बाब जगभर चर्चेची झाली होती. अशा स्थितीत ज्या बेपत्ता महिलेच्या विषयावरून ही चर्चा सुरू झाली, ती महिला पोलिसांमुळे नव्हे तर इंदोर येथील तिच्या बहिणीमुळे पुन्हा कुटुंबात परतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण त्यावेळी चर्चेत असलेला मानवी तस्करी वा मानवी अवयव तस्करी खरेच शिर्डीत होते काय, हा विषय अजून तसाच आहे. ती महिला शिर्डीच्या साई समाधी मंदिराबाहेरील एका दुकानाजवळ गेल्यानंतर तेथे चक्कर येऊन पडली व पुढे काय झाले ते माहीत नाही, असे सांगत आहे. त्यामुळे मधल्या साडेतीन वर्षांच्या काळात तिच्याबाबत काय घडले, मूळ इंदोरचीच असलेली ही महिला पुन्हा इंदोरमध्येच कशी सापडली, मधल्या साडेतीन वर्षात इंदोरमध्येच एका वृद्ध महिलेसमवेत ती राहात असल्याचे सांगत असल्याने ती वृद्ध महिला कोण, तिच्याकडे ही कशी आली, शिर्डीतील ज्या दुकानाजवळ तिला चक्कर आली, ते दुकान कोणते, तेथेच तिला कशी चक्कर आली, चक्कर येऊन पडल्यावर तिला कोणीही पाहिले नाही काय, स्थानिकांपैकी कोणी दवाखान्यात नेले होते का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे जिल्हा पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. 

मानवी तस्करी व मानवी अवयव तस्करीच्या रॅकेटच्या विषयाने शिर्डी हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी केंद्र झाले काय,अशा शंकेची व त्यानिमित्त शिर्डीच्या झालेल्या बदनामीची पाळेमुळे खणून काढण्याची वेळ आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावणे गरजेचे आहे. दरम्यान, शिर्डीतून मागील चार वर्षात २७९जण बेपत्ता झाले असून, त्यातील २१२जण सापडले आहेत. ६७जणांचा अजूनही शोध लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर सापडलेल्या त्या महिलेकडून विविध चाचण्यांद्वारे पोलिसांनी माहिती मिळवली तर एका गंभीर विषयावरील गुढतेचा पडदा हटण्यास मदत होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post