हिवाळ्यामध्ये धुक्यामधून गाडी चालवताना सुरक्षित प्रवासासाठी ‘या’ पाच गोष्टी नक्की करा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

थंडीच्या दिवसात आऊटिंगला जाण्याच्या चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर फिरायला जाताना सगळेच चांगल्या मूडमध्ये असतात. यातही आपली कार असेल तर विचारायलाच नको. हवी तिथे कार थांबवत मजा करत जाण्याची गंमतच काही और असते. पण हा काळ थंडीचा असल्याने समोर धुके असण्याची शक्यता असते. याशिवाय सध्या दिल्लीबरोबरच अनेक शहरांमध्ये धुरकं पसरल्याचे आपण पाहतोय. अशा परिस्थितीत गाडी चालवताना समोरचे काहीच दिसेनासे होते. त्यामुळे काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. म्हणजे पुढे येणाऱ्या अपघातांपासून आपण नक्कीच स्वतःचा आणि इतरांचाही बचाव करू शकतो.

१. धुक्यात किंवा धुरक्यात गाडी चालवताना फोन, गाणी या गोष्टी बंद ठेवा. खिडकीच्या काचा उघड्या ठेवा जेणेकरुन दुसऱ्याने वाजवलेला हॉर्न तुम्हाला ऐकू येईल.

२. धुके असल्यास गाडीचा वेग कमी ठेवा. रांगेची शिस्त पाळा आणि लेन मोडू नका. धुक्यात ओव्हरटेक करणेही धोक्याचे ठरु शकते. धुक्यामुळे समोरचे कमी दिसत असल्याने या गोष्टी पाळणे आवश्यक असते.

३. धुके आणि धुरक्यात गाडी चालवताना फॉग लाईटसचा वापर करा. हे लाईटस हेडलाईटच्या खालच्या बाजूला लहान आकारात असतात. गाडीला या लाईटची सुविधा नसेल तर हेडलाईट लो बिमवर ठेवा.

४. इतरांना तुमची गाडी दिसावी यासाठी ब्लिंकर्स पूर्ण वेळ सुरु ठेवा. वळण घेताना चुकूनही इंडिकेटर न देता वळू नका. हे धोक्याचे ठरु शकते.

५. धुकं किंवा धुरक्यात गाडी थांबवताना ब्लिंकर्स सुरु ठेवा आणि दुसऱ्या वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवा. त्यामुळे अपघात होण्याचा धोका कमी असतो.

Post a Comment

Previous Post Next Post