मेंदी रंगतच नाहीये का? हे उपाय करुन बघाच


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणत्याही शुभ कार्यामध्ये महिला वर्गामध्ये उत्साहाचं वातावरण असतं. मग अगदी कपड्यांपासून ते साजशृंगाराच्या प्रत्येक गोष्टीकडे त्या जातीने लक्ष देतात. एखादा कार्यक्रम असेल किंवा लग्न समारंभ या कार्यामध्ये मेंदी ही ओघाओघाने आलीच. लग्नकार्यामध्ये तर मेंदीशिवाय नववधुचा साजशृंगार हा अपूर्णच असतो. त्यामुळे आता मेंदीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. मात्र मेंदी काढल्यानंतर जर ती रंगली नाही. तर सहाजिकचं प्रत्येक महिलेचा उत्साह कमी होतो. त्यामुळेच मेंदी अधिक रंगण्यासाठी काही घरगुती टीप्स आहेत. या टीप्स अमलात आणल्या तर नक्कीच मेंदीचा रंग खुलून येईल.

१. मेंदी काढल्यावर बराच वेळ हातावर ठेवावी

अनेक वेळा महिला मेंदी वाळल्यानंतर लगेचच हात धुवून टाकतात. मात्र कधीही मेंदी काढल्यानंतर ती जवळपास ७ ते ८ तास हातावर तशीच ठेवावी. भलेही ती वाळली तरीदेखील ती हातावर तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे शक्यतो मेंदी रात्रीच्या वेळात लावावी म्हणजे संपूर्ण रात्रभर मेंदी हातावर तशीच राहते आणि तिचा रंग अधिक खुलतो.

२. साखर आणि लिंबूचा वापर

साखर आणि लिंबाचा रस हे मेंदी काढल्यानंतर अत्यंत फायदेशीर ठरतं. लिंबाचा रस आणि साखर एकत्र करुन हे मिश्रण मेंदीवर लावल्यानंतर मेंदी बराच वेळ हातावर चिटकून राहते. त्यामुळे मेंदीचा रंग मस्त येतो.

३. लवंगांचा धूर हाताला देणे

मेंदी काढून टाकल्यानंतर हात स्वच्छ कोरडे करुन त्याला लवंगांचा धूर द्यावा. यासाठी एका तव्यावर ५-६ लवंगा टाकून त्याच्यातून जो धूर येतो, त्या धुरावर मेंदी काढलेल्या भागावर शेक द्यावा. लवंगाच्या धूर उष्ण असल्यामुळे मेंदी चांगली रंगते.

४. पाण्याने धुवू नये

अनेक वेळा लिंबू-साखरेचं पाणी लावल्यानंतर मेंदी हातावर चिटकून राहते. त्यामुळे काही महिला पाणी किंवा साबणाच्या मदतीने हात धुतात. मात्र असं केल्यामुळे मेंदीचा रंग फिकट होण्याची शक्यता असते. मेंदी सुकल्यानंतर शक्यतो काही काळ त्या भागावर पाणी लावू नये.

Post a Comment

Previous Post Next Post