आता होणार 'या' रुग्णांची शोध मोहीम; राज्य सरकारचे विशेष अभियान सुरू

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यात मागील ८-९ महिन्यांपासून कोरोना रुग्णांची शोध मोहीम व त्यांच्यावरील उपचारांचे नियोजन मोहीम सुरू असताना आता राज्य सरकारने नव्याने क्षय व कुष्ठरुग्णांची शोध मोहीम हाती घेतली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ती सुरू राहणार आहे. या मोहिमेत घरोघरी जाऊन क्षण व कुष्ठरुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे.

कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महापालिका क्षेत्रात संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान १ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे ८ कोटी ६६ लाख २५ हजार २३० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात ग्रामीण भागातील संख्या ६ कोटी ८२ लाख २३ हजार ३९८ असून जोखीमग्रस्त शहरी लोकसंख्या १ कोटी ८४ लाख एवढी आहे. कुष्ठरुग्ण व क्षयरुग्णांच्या लवकर निदानासाठी विविध उपाययोजना सुचविल्या जात आहेत. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार या दोन्ही आजाराचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास रुग्णाला या रोगांपासून निर्माण होणाऱ्या गुंतागुतीचा सामना करावा लागतोच त्याचप्रमाणे त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांना संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध, निदान आणि उपचार करण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. या सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका व आरोग्य सेवक अशा दोन सदस्यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास आरोग्य संस्थेकडून संपूर्ण मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिकाक्षेत्रात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. घरी येणाऱ्या पथकास या तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post