मिडसांगवी परिसर अलर्ट झोन.. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लू सदृश रोगाने झाल्याचे स्पष्ट


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी परिसरात कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूसदृश रोगाने झाल्याचे स्पष्ट झाल्याने या गावाच्या १० किलोमीटर त्रिजेचा परिसर अलर्ट झोन (सतर्क भाग) तसेच संपूर्ण पाथर्डी तालुका नियंत्रित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९मधील तरतुदींनुसार आवश्यक ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याने यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश दिले आहेत.

पाथर्डी तालुक्यातील सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करावी, तेथील कोंबड्यांच्या मृत्यूंची व आजारी कोंबड्यांची माहिती नियंत्रण कक्षाला तातडीने दिली जावी, खासगी कोंबडी पालन करणारांकडील कोंबड्यांचे मृत्यू व आजारी कोंबड्यांची माहिती दिली जावी, येत्या आठवडाभरात जिल्ह्यातील सर्व पोल्ट्री फार्मची व कुकुट पालन करणारांकडील कोंबड्यांची संख्या, त्यातील आजारी व मृत कोंबड्यांची माहिती संकलित करून आजारी कोंबड्यांचे विलगीकरण करून त्या अन्य प्राणी वा पक्ष्यांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेतली जावी तसेच आजारी कोंबड्यांची वाहतूक व विक्री केली जाऊ नये, मिडसांगवी या अलर्ट झोनच्या ५ किलोमीटर त्रिजेच्या परिसरातील पक्षी खरेदी-विक्री व वाहतूक बंद केली जावी, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जावेत तसेच हे मृत पक्षी किमान तीन फुट खोल खड्डा घेऊन त्यात चुना पावडर टाकून ते पुरले जावेत आणि आवश्यकता भासल्यास यासाठी पोलिस बंदोबस्तही घेण्याचे स्पष्ट केले गेले आहे. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या ७८ पथके कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या जिल्हयात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस असून त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
बर्ड फ्ल्‍यू प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अचानक मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांच्या होणाऱ्या मृत्यूंची माहिती त्‍वरित वरिष्‍ठ कार्यालयास व आयुक्‍तालयास कळवावी. क्षेत्रीय स्‍तरावरील अधिकार्‍यांनी त्याबाबत दक्ष राहावे. सर्व शेतकरी व पशुपालकांनी बर्ड फ्ल्‍यू रोगाची लक्षणे पक्ष्यांमध्ये आढळल्‍यास नजिकच्‍या पशुवैद्यकिय दवाखान्‍याशी संपर्क साधावा. पशुवैद्यकिय कर्मचार्‍यांनी रोजच्या तसेच आठवडी बाजारात विशेष सर्वेक्षण मोहीम राबवावी. संशयित क्षेत्रावरून पक्ष्यांची वाहतुक वा ने-आण पूर्णपणे बंद करावी. उघड्या कत्तलखान्‍यात जैवसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, रोजची स्‍वच्‍छता व निर्जंतुकीकरण करावे. अशा कत्तलखान्‍यातुन पक्षी परत येणार नाहीत याची काळजी घ्‍यावी. या रोगाचे जंतू इतर प्राण्यांमध्ये संक्रमित होणार नाहीत, अशा प्रकारची जैवसुरक्षा यंत्रणा असणे अत्‍यावयश्‍क आहे. रोग प्रादुर्भावाच्‍या अनुषंगाने लागणारे साहित्‍य, उपकरणे, रसायने आदींबाबत पूर्वतयारी ठेवावी. मास्‍क, निर्जंतुके, रसायने आदींची उपलब्‍धता करुन ठेवणे व अशा वस्‍तुंच्‍या उपलब्‍धतेसंबंधी आवयश्‍क बाबींची पुर्तता करुन ठेवणे तसेच या वस्‍तु आवश्यक वेळी अविरतपणे कशा उपलब्‍ध होतील, याविषयीची माहिती कायमपणे ठेवण्‍यात यावी. 2015 च्‍या सर्वेलन्‍स प्‍लॅननुसार व्‍यापक बर्ड फ्ल्‍यू सर्वेक्षण मोहीम सुरू ठेवावी. जेथे पोल्‍ट्री फार्मस आहेत, तेथे आवश्‍यकतेनुसार याबाबतची कार्यवाही करावी. फक्‍त शासकीय नव्‍हे तर खासगी पोल्‍ट्री फार्मवरसुध्‍दा याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही या सूचनांतून स्पष्ट करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींनाही सूचना
प्रत्‍येक गावांतील ग्रामपंचायतीने धुण्‍याचा सोडा (सोडियम कार्बोनेट) यांचे 1 लिटर पाण्‍यामध्‍ये 7 ग्रॅम याप्रमाणे द्रावण तयार करुन कोंबड्यांची खुराडे, गुरांचे गोठे, गावांतील गटारे, नाल्‍या, पशुपक्ष्‍यांचा वावर असलेल्‍या भिंती व जमिनीवर तात्‍काळ फवारणी करावी. पुन्हा दर 15 दिवसाच्‍या अंतराने 3 वेळेस फवारणी करावी. यामुळे विषाणू, जिवाणू, माश्‍या, गोचीड आदींचा प्रादुर्भाव रोखणे शक्‍य होईल. सर्वेक्षणासाठीचे रोगनमुने नियमितपणे प्रयोगशाळेस पाठवावेत. बाहेरून येणारे अर्थात स्थलांतरित (पाहुणे) पक्षी बर्ड फ्ल्‍यू रोगाच्‍या प्रसारामध्‍ये महत्‍वाची भूमिका बजावत असल्‍याने, ते ज्‍या भागात भेट देतात, त्‍या भागामध्‍ये व्‍यापक, नियमित व वारंवार सर्वेक्षण मोहिमा राबवावी, अशा मार्गदर्शक सूचना देण्यात आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post