पाकिस्तानच्या 'त्या' दणकेबाज पराभवाचा सुवर्ण महोत्सव


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भारत माता की जय.. वंदे मातरम.. वीरता और विश्वास.. अशा जोरदार घोषणांमध्ये पाकिस्तानवर १९७१ मध्ये मिळवलेल्या विजयाचा जल्लोष लष्करी जवानांनी शुक्रवारी अहमदनगर येथे साजरा केला. 1971 च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा दणकेबाज पराभव करून बांगलादेशची निर्मिती केल्याच्या घटनेला 50 वर्षे होत आहे. या विजयोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय लष्कराने स्वर्णिम विजय मशाल रॅलीचे आयोजन केले असून, शुक्रवारी ही मशाल रॅली अहमदनगर येथे आली. त्यावेळी जोरदार घोषणा देत तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ही मशाल ज्योत एमआयआरसीच्या युद्ध स्मारकमध्ये स्थापित करण्यात आल्यावर 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या अधिकारी व जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. ही मशाल ज्योत येथे 4 फेब्रुवारीपर्यंत ठेवली जाणार आहे.

1947ला भारताची फाळणी होऊन पूर्व व पश्चिम पाकिस्तानची निर्मिती झाली, त्यानंतर तब्बल 24 वर्षानी झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव करून पूर्व पाकिस्तान स्वातंत्र करून बांगला देशाची निर्मिती केली. भारत-पाकिस्तानचे हे युद्ध 3 ते16 डिसेंम्बर 1971 दरम्यान झाले. 16 डिसेम्बरला पाकिस्तानने शरणागती पत्करल्यावर हे युद्ध संपले. या घटनेस आता 50 वर्षे झाली आहे. त्यामुळे त्या विजयोत्सवाचा सुवर्ण महोत्सव भारतीय लष्कराद्वारे वर्षभर साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशभर विविध उपक्रम होणार आहेत. १९७१ साली डिसेंबर महिन्यात भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानी लष्करावर एक निर्णायक आणि ऐतिहासिक विजय मिळवला. ज्यामुळे एका नव्या देशाची-बांगला देशाची निर्मिती झाली आणि त्याचबरोबर दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात मोठ्या लष्करी शरणागतीची देखील नोंद झाली. 

१९७१ च्या युद्धातील भारतीय लष्कराच्या विजयाचे स्मरण करीत १६ डिसेंबर २०२० ते १६ डिसेंबर २०२१ हे वर्ष स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथील अमर ज्योतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार विजय मशाली प्रज्ज्वलित करून त्या देशातील वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आल्या आहेत. त्यामधील एका स्वर्णिम विजय मशाल शुक्रवारी नगरमध्ये आली. ही मशाल घोडेस्वार, सायकलस्वार व धावपटूंनी आर्मड कोअर सेंटर अँड स्कूलला आधी नेली व नंतर मॅकेनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट (एमआयआरसी) येथील युद्ध स्मारक येथे आणली. त्याठिकाणी १९७१ च्या युद्धामध्ये सहभागी झालेले ब्रिगेडियर आर.एस.रावत (वीएसएएम, सेवानिवृत्त) यांच्याकडे ही मशाल देण्यात आली. त्यानंतर ही मशाल युद्ध स्मारक येथे ठेवण्यात आली व तेथे एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही.एस.राणा (वीएसएम) यांनी तसेच १९७१ च्या युद्धामध्ये सहभागी झालेल्या निवृत्त अधिकारी व जवानांनी त्या युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. याशिवाय एमआयआरसीमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या बांगलादेश येथील सैन्य अधिकाऱ्यांनी देखील युद्ध स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी १९७१च्या युद्धात सहभागी झालेले नगर जिल्ह्यातील ऑननरी कॅप्टन बी. के. बागल, सुभेदार मेजर बबन पठारे, पीटी ऑफिसर सुधाकर लोंढे, पुण्याचे कर्नल अनंत गोखले आदींसह त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. ही मशाल युद्ध स्मारक येथे ४ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. तसेच यानिमित्त एमआयआरसी येथे विविध उपक्रम होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post