वेषांतर करून खुनी पकडला; 'आश्रय' देणाराही ताब्यात


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

युवकाचा खून करून फरार झालेला आरोपी दीड महिन्यानंतर नगरच्या पोलिसांनी चक्क वेषांतर करून पकडला. या दीड महिन्याच्या काळात त्याला आश्रय देणारासही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नगरच्या पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार भालसिंग यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार विश्वजीत कासार याच्यासह चार आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पुणे जिल्ह्यामध्ये पकडले. विश्वजीत कासार गेल्या दीड महिन्यापासून पसार होता. पोलिसांनी वेषांतर करून त्याला जेरबंद केले. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी मयूर नाईक, भरत पवार या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर, विश्वजीत कासार याला आश्रय देणारा संतोष आप्पासाहेब धोत्रे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी ही माहिती दिली.

ओंकार बाबासाहेब भालसिंग (रा. वाळकी) यास अमानुषपणे मारहाण करुन त्याची हत्या करणारा सराईत आरोपी विश्वजीत कासार व त्याच्या इतर तीन साथीदारांना जेरबंद करण्यात आले आहे. ओंकार भालसिंग (ता.नगर) यास मागील भांडणाच्या कारणावरुन राग मनात धरुन विश्वजीत कासार याने व त्याच्या इतर साथीदारांनी १७ नोव्हेंबरला ओंकार भालसिंग हा मोटार सायकलवरुन घरी जात असतांना त्यास समोरुन वाहनाने धडक देवुन खाली पाडुन लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करुन जखमी केले होते. जखमी ओंकार भालसिंग याच्यावर पुणे येथे औषधोपचार चालु असताना त्याचे ५ डिसेंबरला निधन झाले. या घटनेबाबत नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये विश्वजीत कासार व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासुन गुन्हयातील आरोपी फरार झाले होते. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन आरोपींचा तात्काळ शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमुन सूचना दिल्याने पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह गणेश इंगळे, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोढे, संदीप पवार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, देवेंद्र शेलार, कमलेश पाथरुट, योगेश सातपुते, संदीप दरंदले, रणजीत जाधव, राहुल सोळंके, संभाजी कोतकर, भरत बुधवंत व चंद्रकांत कुसळकर यांची वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला जात होता. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपींची माहिती काढुन शोध घेत असतांना अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्हयातील आरोपी विश्वजीत कासार हा वाघोली येथील हॉटेल श्रध्दा येथे येणार आहे. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल श्रध्दा-वाघोली येथे जावुन वेषांतर करुन हॉटेलच्या बाहेर सापळा लावला. त्यानंतर काही वेळातच आरोपी विश्वजीत कासार हा आजुबाजूस संशयित नजरेने पाहणी करत हॉटेलच्या दिशेने येत असल्याचे दिसला. त्याच वेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी झडप घालुन त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास अधिक विश्वासात घेवून गुन्हयातील त्याच्या इतर साथीदारांबाबत चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीवरुन त्याचे साथीदार मयुर नाईक, भरत पवार यांना वेगवेगळया ठिकाणाहुन ताब्यात घेतले

आश्रय देणाराही ताब्यात

त्यानंतर आरोपी विश्वजीत कासार यास विश्वासात घेवुन गुन्हा घडल्यापासुन आजपावेतो कोठे-कोठे वास्तव्य केले आहे, याबाबत कसुन चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र संतोष धोत्रे (रा. कारेगांव, ता. शिरुर) याने वेळोवेळी राहण्याची व्यवस्था करुन आश्रय दिल्याने त्याच्याकडे राहत होतो, असे सांगितले. त्यावरुन आरोपी विश्वजीत कासार यास आश्रय देणारा आरोपी संतोष धोत्रे यास ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींना गुन्हयात अटक करुन गुन्हयाचा सखोल तपास सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करीत आहेत. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे.

त्याच्याविरुद्ध १७ गुन्हे

आरोपी विश्वजीत कासार हा उच्चशिक्षित असून त्याने इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे. तो गेल्या दीड महिन्यापासून फरार असून या काळात तो गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल व मुंबई या भागात फिरत होता. एवढा उच्चशिक्षित तरुण गुन्हेगारीकडे का वळला, या दृष्टीनेही पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे. तसेच विश्वजीत कासार याच्यावर विविध पोलीस स्टेशनमध्ये तब्बल १७ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये फसवणुकीचा, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, खून आदी गुन्हे आहेत.

मोकाची मागणी

वाळकी येथील ओंकार भालसिंग यांच्या खून प्रकरणातील आरोपी विश्वजीत कासार व त्याचे साथीदार सुनील अडसरे, शुभम लोखंडे, सचिन भामरे, इंद्रजीत कासार यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मयत मुलाची आई लता भालसिंग व वाळकी ग्रामस्थांच्यावतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली होती. सदर आरोपींवर नगर जिल्हा, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जालना जिल्हा व इतर ठिकाणी खंडणी, खून, दरोडा, अपहरण, जबरी मारहाण, फसवणूक यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांना नगर जिल्हा न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दहा वर्षे शिक्षा सुनावली होती व ते हायकोर्टातून जामिनावर मुक्त आहे. परंतु त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. विश्वजीत कासार हा त्याच्या टोळीचा मुख्य म्होरक्या असून तो त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हे कायम करतो व केलेल्या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. त्यांच्यापासून समाजास व आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे व आम्हाला आमचे जीवन धोक्याचे वाटते. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे आता पोलिसांची याबाबतही भूमिका महत्त्वाची असणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post