दिग्गज नेत्यांचा लागणार कस.. जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

स्थापनेची ६० वर्षे पूर्ण केलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तब्बल सहा वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळींचा कस लागणार आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांपाठोपाठ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश राज्य सहकार प्राधिकरणाला दिले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाने आता अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक जाहीर केली आहे. २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आता २०२१मध्ये बँकेची निवडणूक होत आहे. २० फेब्रुवारीला बँकेच्या २१ जागांसाठी मतदान होणार असून, २१ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्याचवेळी बँकेवर वर्चस्व कोणाचे हे सिद्ध होणार आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी राज्य सहकार प्राधिकरणाने जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, त्यांनी निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काहीही असली तरी जिल्हा बँकेच्या कारभारात राजकीय जोडे बाहेर काढून ठेवण्याची परंपरा पूर्वसूरींनी जपली आहे. तीच आजतागायत सुरू आहे. पण ही परंपरा बँकेच्या प्रत्यक्ष कामात जपली जाते. बँकेच्या निवडणुकीत मात्र जोरदार संघर्ष नेहमी होतो. जिल्ह्यातील बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन दिग्गज नेत्यांभोवतीच ही निवडणूक फिरते. त्यात मग काळाची पावले ओळखून काहीजण दोन्हीपैकी सोयीचा गट निवडून त्यासमवेत राहतात. पण राजकीय पक्ष बदलांचाही व राज्यातील सरकार व राजकीय स्थितीचाही परिणाम या निवडणुकीवर होतो. मागच्यावेळी बँकेच्या निवडणूक काळात राज्यात भाजप सरकार होते व त्यावेळी निवडणुकीनंतर बहुमत जमवून सत्ता ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न होते. पण नंतर जिल्ह्यातील दिग्गजांनी तसे होऊ दिले नाही. या पार्श्वभूमीवर यंदा राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे व त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताकदीविरोधात एकटा भाजप या निवडणुकीत उतरणार आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

दिग्गजांसमोर आव्हान

थोरात व विखेंसह ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, मधुकरराव पिचड, बबनराव पाचपुते, शंकरराव कोल्हे, भानुदास मुरकुटे, प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर घुले, अरुण जगताप, शिवाजीराव कर्डिले, शंकरराव गडाख, मोनिकाताई राजळे, स्नेहलता कोल्हे, प्राजक्त तनपुरे, बिपीन कोल्हे, डॉ. सुधीर तांबे, प्रा. राम शिंदे, सदाशिव लोखंडे, डॉ. सुजय विखे, विजय औटी अशा बड्या राजकारण्यांसह यंदा प्रथमच आमदार झालेले रोहित पवार, आशुतोष काळे, निलेश लंके, डॉ. किरण लहामटे, लहू कानडे यांच्यासह युवा नेते वैभव पिचड, करण ससाणे, संग्राम जगताप, राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, राजेंद्र फाळके, अशोक भांगरे अशा बड्या मंडळींसमोर एकमेकांचे आव्हान असणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यावर कोणता दिग्गज कोणाविरुद्ध उभा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम-जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या एकूण जागा-२१ (विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघ (प्रत्येक तालुक्यातून १) -जागा १४. शेतीपूरक संस्था मतदार संघ- जागा १. बिगर शेती संस्था मतदार संघ-जागा १. राखीव जागा - ५ (यात महिला-२, अनुसूचित जाती-जमाती-१, इतर मागासवर्गीय-१, विमुक्त व भटक्या जमाती-१). बँकेचे एकूण मतदार-(संस्था प्रतिनिधी)-३ हजार ५७७. उमेदवारी दाखल करण्याची मुदत- १९ ते २५ जानेवारी (स्थळ-जिल्हा सहकारी उपनिबंधक कार्यालय). दाखल अर्जांची छाननी-२७ जानेवारी. उमेदवारी माघारीसाठी मुदत- २८ जानेवारी ते ११ फेब्रुवारी. मतदान दिनांक- २० फेब्रुवारी व मतमोजणी-२१ फेब्रुवारी.

Post a Comment

Previous Post Next Post