एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातील १४ जागांपैकी बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यापैकी दोन जागा याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, राहिलेल्या १२ जागांबाबत उमेदवारी अर्ज छाननीनंतर प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम उमेदवार यादीनंतर बिनविरोधचे प्रयत्न सुरू होणार आहे. शिवाय अर्ज माघारीची मुदत ११ फेब्रुवारी असल्याने या काळात बिनविरोध होण्याच्यादृष्टीनेच विशेष प्रयत्न अपेक्षित आहे.
दरम्यान, निवडणुकीसाठी दाखल असलेल्या १३४ अर्जांपैकी ५जणांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले आहेत. श्रीरामपूर, जामखेड व अन्य काही ठिकाणच्या उमेदवारांबाबत हे आक्षेप आहेत. त्यावर बुधवारी सायंकाळपर्यंत सुनावणी सुरू होती. गुरुवारी (२८ जानेवारी) सकाळी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे. त्यानंतरच कोणत्या मतदार संघात निवडणूक होणार व कोठे बिनविरोध होणार, याचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होणार आहे.जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी १३४ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. त्यांची छाननी बुधवारी झाली. काही उमेदवारांच्या अर्जांवर आक्षेप घेण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे व निर्णय राखून ठेवला होता. तो उशीरा जाहीर करून गुरुवारी सकाळी अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
मुंबईच्या बैठकीकडे लक्ष
राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत. शिवाय शक्य झाल्यास भाजपमधील कर्डिले गटही समवेत घेण्याचे नियोजन आहे. यामुळे बँकेच्या निवडणुकीत विखे गट एकाकी पडण्याच्या स्थितीत आहे. अर्थात कर्डिले गटाला समवेत घेण्याची सहमतीची स्थिती फक्त सोसायटी मतदार संघापुरती मर्यादीत असल्याचे सांगितले जाते. या मतदारसंघातील १४ जागांपैकी संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, पारनेर व श्रीगोंदा या सहा जागा महाविकास आघाडीच्या निश्चित मानल्या जातात. राहिलेल्या ८ जागांपैकी आणखी किमान एक जागा पदरात पाडून घेण्याचे महाविकासचे प्रयत्न आहेत. तसेच त्यानंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांसह कर्डिले गटाच्या मदतीने शेतीपूरक आणि बिगरशेती या दोन मतदारसंघांसह दोन महिला व तीन राखीव अशा ७ जागांवरही एकहाती विजय मिळवण्याचे मनसुबे आहेत. त्यामुळे २१ सदस्यांच्या बँकेत किमान १३ ते १४ जागा जिंकून सत्ता राखण्याचे नियोजन सुरू आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. लोकसभेचे अधिवेशन २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निर्णयाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. छाननीनंतर अंतिम उमेदवारांची यादी निश्चित झाल्यावर व माघारीसाठी ११ फेब्रुवारीपर्यंत मुदत असल्याने या काळात सर्वांच्या सोयीनुसार मुंबईत ही बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पालकमंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती अपेक्षित आहे. या बैठकीतच भाजपचा कर्डिले गट समवेत घ्यायचा की नाही, याचाही निर्णय होणार आहे. त्यामुळेच आता बँकेच्या निवडणुकीची उत्सुकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
Post a Comment