जिल्हा बँक निवडणुकीत पवारांनी घातले लक्ष; मुंबईत रणनीती ठरणार


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची कामधेनू मानल्या जाणाऱ्या व जिल्ह्यातील सर्वपक्षीय बड्या नेत्यांच्या राजकारणाला आधार देणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारप्रमाणेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीच्या माध्यमातून उतरण्याच्या सूचना त्यांनी जिल्ह्यातील कारभाऱ्यांना दिल्या आहेत व यासाठीच्या नियोजन बैठकीसाठी येत्या २७ वा २८ जानेवारीला मुंबईत येण्याचेही आदेश दिले. राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासमवेत या बैठकीत बँक निवडणुकीचे नियोजन करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

नगरला हॉस्पिटल उदघाटनानिमित्त आलेल्या पवारांनी आ. अरुण जगताप यांच्या निवासस्थानी भेट दिली. जगताप कुटुंबियांच्यावतीने खा.पवार यांचा आ.अरुण जगताप व आ.संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी पार्वती जगताप, जी.प.सदस्य सुवर्णा जगताप, नगरसेविका शीतल जगताप, विलास जगताप, डॉ.शशिकांत फाटके, डॉ.वंदना फाटके, वैभव जगताप, विकी जगताप उपस्थित होते. यावेळी तोंडाला मास्क लावलेल्या खा.पवार यांनी गाडीतून उतरताच उपस्थित सर्व नेत्यांना तोंडाला मास्क लावण्याची सूचना केली.

बँक निवडणुकीवर झाली चर्चा
यावेळी खा.पवार यांनी उपस्थित नेत्यांबरोबर जिल्हा बँकेच्या होणाऱ्या निवडणुकीबाबत चर्चा करून राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी चंद्रशेखर घुले व पांडुरंग अभंग यांनी निवडणुकीच्या सद्य परिस्थितीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आ. निलेश लंके, आ. लहू कानडे, आ.आशुतोष काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, राहुल जगताप, उदय शेळके, घनश्याम शेलार, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी एकत्र राहून ही निवडणूक लढवावी, अशी सूचना पवार यांनी केली. बँकेच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी २७ वा २८ जानेवारीला मुंबईत बैठक घेऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री शंकरराव गडाख, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी मुंबईत यावे, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्याविरोधात भाजपच्या बाजूने राधाकृष्ण विखे, मधुकरराव पिचड, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा. राम शिंदे ताकद लावणार आहेत. त्यांच्या जोडीला शिवाजीराव कर्डिले व स्नेहलता कोल्हेही असल्याचे सांगितले जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी मंत्री थोरातांनी संगमनेरात जिल्हा बँकेबाबत घेतलेल्या बैठकीस कर्डिले, वैभव पिचड, विवेक कोल्हे, सीताराम गायकर अशी काही भाजपची मंडळी उपस्थित होती, असेही सांगितले जाते. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी आपली एकत्रित ताकद दाखवण्याच्या तयारीत असताना व त्यासाठी खुद्द मोठ्या पवारांनी लक्ष घातले असताना दुसरीकडे त्यांच्याविरोधात भाजपचे पॅनेल होते की विखेंचे स्वतंत्र पॅनेल होते, याचा संभ्रम वाढत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post