जिल्हा बँक निवडणूक: दोन्ही काँग्रेस-भाजप सहमतीला सेनेची अडचण? छाननीनंतर होणार 'तो' फैसला


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

हीरक महोत्सवी वर्ष साजरे केलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या कारभारात राजकीय जोडे बाहेर काढून सहमतीने कामकाज करण्याची मागील ६४ वर्षांपासूनची परंपरा यंदाच्या निवडणुकीतही जपण्याची काँग्रेसची तयारी आहे व भाजपच्या काही नेत्यांशी तशी त्यांची प्राथमिक चर्चाही झाली आहे. पण यात आता शिवसेनेचा अडथळा येण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेच्या ४ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे व राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे जिल्हा बँकेतही शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र लढून सत्ता मिळवावी, असे त्यांचे म्हणणे आहे. पण जिल्हा बँकेच्या राजकारणात शिवसेनेचे आतापर्यंतचे अस्तित्व फारसे प्रभावी नसल्याने दोन्ही काँग्रेस व भाजपने सहमतीने आणि एकमेकांच्या मदतीने प्रमुख जागांचे आपसात वाटप करून घेण्याचे मनसुबे सेनेमुळे धुळीस मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळेच दाखल उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर बँकेच्या निवडणुकीबाबत मोठा राजकीय फैसला अपेक्षित असून, यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना होतो की, सेनेला एकाकी पाडून बाकी सारे एक होतात, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी १३४ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल आहेत. राहात्यातून माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के व शेवगावमधून माजी आमदार चंद्रशेखर घुले बिनविरोध झाले आहेत. बाकी १९ जागांसाठी किती उमेदवार रिंगणात राहतात, याचे चित्र बुधवारी (२७ जानेवारी) उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय डावपेच जोरात सुरू आहेत. मात्र, या डावपेचांना शिवसेनेमुळे अडचण झाल्याचे दिसू लागले आहे.

जिल्हा बँकेत शिवसेनेचे प्रतिनिधीत्व असावे, या भूमिकेतून शिर्डीचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुढाकार घेतला आहे. या निवडणुकीत त्यांनी अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून, अनिता रमाकांत गाडे यांनी महिला राखीव मतदार संघातून, नगरचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी इतर मागासवर्गीय मतदार संघातून तर पारनेर सेवा सोसायटी मतदार संघातून रामदास भोसले अशा चौघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. या अर्जांबाबत बोलताना खा. लोखंडे म्हणाले, नगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये कायमच शिवसेनेच्यावतीने सहकार्य केले गेले आहे. शेतकर्‍यांची बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. त्यामुळे शिवसेनेने कधीही या बँकेबाबत राजकारण केले नाही. राज्यात शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतही शिवसेनेचे संचालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभारात आता शिवसेनाही सक्रीय आहे. त्यासाठीच आता शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. या उमेदवारांना अनेकांचे पाठबळ मिळणार असल्याने ते विजयी होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

पण सेनेच्या याच भूमिकेमुळे जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेसची अडचण झाल्याचे मानले जाते. जिल्हा बँकेच्या राजकारणात जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीही नेहमी सहभागी असते. यातील काही प्रमुख नेते वैयक्तिक व विधानसभा राजकारणाच्या अनुषंगाने भाजपमध्ये आहेत. पण पूर्वाश्रमीचे दोन्ही काँग्रेस परंपरेतील असल्याने जिल्हा बँकेच्या थोरातांच्या सहमतीच्या भूमिकेला अनुकूलही आहेत. अशा स्थितीत सेनेने अचानक उसळी खाल्ल्याने दोन्ही काँग्रेस व भाजप नेत्यांची अडचण झाली आहे. त्यामुळेच आता दोन्ही काँग्रेस सेनेला समवेत घेऊन भाजपविरोधात लढते की, दोन्ही काँग्रेस, भाजप व सेना मिळून पारंपरिक विरोधक विखेंविरोधात लढतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post