जिल्हा बँक निवडणूक : दोन माजी आमदारांपाठोपाठ आणखी तीन तालुके बिनविरोध?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रशेखर घुले व अण्णासाहेब म्हस्के यांची निवड जवळपास बिनविरोध झाली आहे. विविध कार्यकारी सेवा संस्था मतदार संघातील शेवगाव व राहाता या दोन तालुक्यात अनुक्रमे घुले व म्हस्के यांचेच एकापेक्षा अधिक अर्ज दाखल आहेत. २७ रोजी छाननीच्यावेळी यापैकी एक अर्ज रिंगणात राहील व प्रतिस्पर्धी कोणाचाही अर्ज नसल्याने याच दिवशी या दोन्ही बिनविरोध निवडींवर शिक्कामोर्तब होईल. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक व भाजपला (की विखे पॅनेलला?) २१ पैकी आताच प्रत्येकी एक जागा मिळाल्याचे स्पष्ट होईल. दरम्यान, याच मतदार संघातील नगर, पाथर्डी व संगमनेर या तीन तालुक्यांतही बिनविरोध निवडी अपेक्षित मानल्या जात आहेत. २७ रोजी छाननीनंतर कितीजण रिंगणात राहतात व पुढे माघारीच्या दिवशी कितीजण माघार घेतात, यावर या तीन तालुक्यांच्या बिनविरोध निवडींचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या तीन तालुक्यांतून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे व माधवराव कानवडे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.

जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी २० फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात गर्दी उसळली होती. २१ जागांसाठी ३१२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्थात बहुतांश उमेदवारांनी एकापेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने प्रत्यक्षात सुमारे दीडशे जणांचे अर्ज दाखल आहेत. 

विद्यमान अध्यक्ष सीताराम गायकर, जगन्नाथ राळेभात, अंबादास पिसाळ, आ. निलेश लंके, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, आ. आशुतोष काळे, माजी आमदार वैभव पिचड, पांडुरंग अभंग, भानुदास मुरकुटे, राहुल जगताप, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, राजेंद्र नागवडे, पांडुरंग सोले, दत्ता पाचपुते यासह अन्य दिग्गज राजकीय नेतेमंडळी या रिंगणात आहेत. दाखल असलेल्या अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर २७ रोजी करणार असून, त्याच दिवशी प्रत्येक मतदारसंघात नेमके किती व कोण उमेदवार उभे आहेत, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्याआधी छाननीच्या वेळी कोणता उमेदवार कोणाच्या उमेदवारीला आक्षेप घेतो, याचीही उत्सुकता आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर अर्ज माघारीची मुदत ११ फेब्रुवारीपर्यंत असल्याने या काळात राजकीय घडामोडी काय घडतात, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post