जिल्हा बँक भाजप लढवणार की 'त्यांचे' स्वतंत्र पॅनेल होणार?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचे राजकारण थोरात व विखे या दोन नावांभोवतीच नेहमी फिरते. यंदाही सहा वर्षांनी होत असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीतही हीच दोन नावे चर्चेत आहेत. जिल्ह्यातील अन्य राजकारणी आपल्या सोयीनुसार या दोन्हीपैकी एका गटाशी जुळवून घेतील, असे दिसत असले तरी राज्यातील बदललेल्या राजकारणाचा परिणाम यंदाच्या बँकेच्या निवडणुकीवर होणार आहे. आ. राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खा. ड़ॉ. सुजय विखे हे सध्या भाजपमध्ये असल्याने व त्यांच्यासमवेत माजी आमदार मधुकरराव पिचड, शिवाजीराव कडिले, प्रा. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे तसेच आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते अशी बडी मंडळी असली तरी भाजप ही निवडणूक स्वतंत्र पॅनेल करून लढवणार की, विखे गट आपला स्वतंत्र पॅनेल करणार, हा उत्सुकतेचा विषय झाला आहे. दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना, 'भाजपचे पॅनेल वा आमचे स्वतंत्र पॅनेल असे दोन्ही पर्याय आमच्यासमोर आहेत व दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाच्या आधारावर बँकेत सत्ता आणण्याचे नियोजन आमचे आहे', असे आवर्जून स्पष्ट केले.

जिल्हा सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी २० फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. १९ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार विखे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर भाष्य केले. पुढच्या आठवड्यात मुंबईत भाजपचे नेते व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात बैठक होणार आहे. प्रा. शिंदे व कर्डिलेंसह सर्वजण उपस्थित राहणार आहे. या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक भाजपचे स्वतंत्र पॅनेल करून लढायची की नाही, याचा निर्णय होणार असल्याचे ते म्हणाले. पक्षाने तसा निर्णय घेतला तर आम्ही पक्षादेशाप्रमाणे काम करू, पण पक्षाने स्वतःचे स्वतंत्र पॅनेल नाही करण्याचा निर्णय घेतला तर मग आम्ही (विखे) स्वतंत्र पॅनेल करून लढण्याचा विचार करू. या दोन्ही पर्यायांपैकी कोणत्याही पर्यायाच्या बळावर बँकेत सत्ता आणण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असेही खा. डॉ. विखेंनी स्पष्ट केले. 

दुसरीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही काँग्रेस व शिवसेना यांची बँकेच्या निवडणुकीतही आघाडी होते का, की फक्त दोन्ही काँग्रेसच या निवडणुकीत एकत्र उतरतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post