'या' बँकेवर राहणार 'संगमनेर'चे वर्चस्व.. अंतिम मतदार यादी जाहीर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, एकूण साडेतीन हजारावर मतदारांपैकी २० टक्के म्हणजे सुमारे सातशे मतदार संगमनेर तालुक्यातील असल्याने या बँकेच्या निवडणुकीत संगमनेर तालुक्याचे...म्हणजेच संगमनेरचे नेते व राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व राहणार आहे. अर्थात जिल्हा बँकेच्या राजकारणातील थोरातांचे पारंपरिक विरोधक आ. राधाकृष्ण विखे यांची भूमिकाही निवडणुकीत महत्त्वाची असणार आहे.

स्थापनेची ६० वर्षे पूर्ण झालेल्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक मागील २०२०च्या फेब्रुवारीमध्येच होणे अपेक्षित होते. पण कोरोना संसर्गामुळे ही निवडणूक वर्षभर लांबणीवर पडली. आता राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडू लागला आहे. या पाठोपाठ सहकार क्षेत्रातील निवडणुकांचाही धमाका सुरू झाला आहे. साखर कारखान्यांच्या निवडणुका जाहीर होत असून, आता जिल्हा सहकारी बँकेचीही निवडणूक येत्या एक-दोन दिवसात जाहीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील विधान सभेचे १२ आमदार, विधान परिषदेचे २ आमदार, दोन खासदार यांच्यासह माजी आमदार-खासदार व ज्येष्ठ नेते मिळून सुमारे ४० ते ५० दिग्गज नेत्यांची ताकद ही बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी लागणार आहे. अर्थात बँकेच्या स्थापनेपासूनच राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकरी विकासाभिमुख कारभार जिल्ह्यातील त्या-त्या वेळच्या दिग्गज नेतृत्वाने केला आहे. तसाच तो यापुढेही अपेक्षित असल्याने आताच्या निवडणुकीतही पक्षीय बंधने बाजूला ठेवून राजकीय समीकरणे जुळतात की पक्षीय ताकद एकमेकांविरुद्ध आजमावली जाते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून, बँकेच्या २१ जागांसाठी ३ हजार ५७७ मतदार आहेत. यात सर्वाधिक ६९१ मतदार (सुमारे २० टक्के) एकट्या संगमनेर तालुक्यातील आहेत. विविध कार्यकारी सेवा संस्था, शेतीपूरक संस्था व बिगर शेती संस्था अशा तीन वर्गवारीतील संस्थांचे प्रतिनिधी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यासाठीचे प्रतिनिधी ठरावही अंतिम झाले आहेत. आता फक्त प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील एकूण मतदार असे- अकोले-२२५, जामखेड-१११, कर्जत-१६०, कोपरगाव-३६२, नगर -३६६, नेवासे-२४४, पारनेर-२२४, पाथर्डी-१२४, राहाता-२८९, राहुरी-२४९, संगमनेर-६९१, शेवगाव-११८, श्रीगोंदे-२७० व श्रीरामपूर-१४४.

Post a Comment

Previous Post Next Post