ठाकरेंचा 'तो' आदेश खा. लोखंडेंनी २५ वर्षांनी घेतला मनावर?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शिवसेना प्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात युती सरकार असतानाच्या म्हणजे १९९६-९७च्या काळात नगरचे नाव अंबिकानगर करण्याचा आदेश दिला होता. या आदेशाची अंमलबजावणी त्या काळात युती सरकारने केली नाही. पण आता तब्बल २५ वर्षांनी सेनेचेच शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ही मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेना प्रमुखांचा तो आदेश खा. लोखंडेंनी मनावर घेतला काय, असे यानिमित्ताने वाटू लागले असले तरी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यावरून राज्यात शिवसेना-काँग्रेस व भाजप असा कलगीतुरा रंगला असताना यात अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचा नवा विषय खा. लोखंडे यांनी छेडल्याने तो राजकीय चर्चेचा झाला आहे. त्यामुळेच त्याचे पुढे काय होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. दरम्यान, नगरच्या दीनदयाळ परिवाराने खा. लोखंडे यांच्या अहमदनगरचे अंबिकानगर करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातही हा नामांतर विषय चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. त्यामुळे तेथे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा विषय हॉट झाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी या नामांतराला विरोध केला आहे, तर शिवसेनेने असे नामांतर ३० वर्षांपूर्वीच झाले आहे व आता फक्त कागदोपत्री तसा बदल करणे बाकी असल्याचे स्पष्ट केल्याने हे वादंग अधिकच पेटले आहे. त्यात भाजपने नामांतराच्या विषयात सेना-काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरू असल्याचा दावा करून वादाला नवी फोडणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर, औरंगाबाद-संभाजीनगर नामांतराचा विषय राज्यात चर्चेत असताना त्यात आता अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची नवी मागणी सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी छेडल्याने नगर जिल्ह्यातही हा विषय चर्चेत आला आहे. पण नगर मनपाची निवडणूक अजून ३ वर्षे लांब असल्याने खा. लोखंडेंच्या मागणीचे कितपत पडसाद नगर शहर व जिल्ह्यात उमटतील, याबद्दल शंका आहे. पण २५-३० वर्षांपूर्वीचा जुना विषय पुन्हा चर्चेत आल्याने जिल्हावासियांना चर्वितचर्वण करण्यास यानिमित्ताने संधी मिळाली आहे. अर्थात खा. लोखंडे हे शिर्डीचे खासदार आहेत, नगर शहर वा नगर लोकसभा मतदार संघाशी त्यांचा थेट असा संबंध येत नाही. पूर्वी कर्जत-जामखेड या नगर दक्षिण जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे ते तीनवेळा आमदार असताना त्यांचा नगरशी संबंध येत होता. पण आता दुसऱ्यांदा ते शिर्डीचे खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांचे संपर्क कार्यालय पहिल्यांदा नगर शहरात सुरू केले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विषय हाती घेण्याचे कामही त्यांनी सुरू केले आहे. याच अनुषंगाने आता अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी त्यांनी केली असावी, असे बोलले जात आहे.

ठाकरेंचा होता तो आदेश
राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर त्यानंतर वर्षभरातच नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एक धर्मांतराचा विषय गाजला होता. त्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडियापार्कवर जाहीर सभा झाली होती व त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिका माता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते. पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षात अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. पण तिला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. पण मागील २०च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. पण तीही निवडणुकीनंतर बासनात गुंडाळून ठेवल्याने दुर्लक्षित झाली. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे. पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण आहे. कारण, ही मागणी स्थानिक पातळीवर उचलून धरण्यासाठी जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे, नेवाशाचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे. राजकीय चर्चेचा व राज्यातील महाविकास आघाडी राजकीय सरकारला अडचणीत आणण्याच्या हिशेबाने जिल्ह्यातील भाजपचे तीनही आमदार व नगरचे भाजपचे खासदार हे खा. लोखंडेंच्या या मागणीला हवा देऊ शकतात. पण राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील ६ आमदार व काँग्रेसचे २ आमदार काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. याशिवाय सेनेच्या खासदाराने उपस्थित केलेल्या या मागणीला नगर शहरातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते कितपत उचलून धरतात, हे पाहणेही उत्सुकतेचा भाग असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युती सरकारच्या काळात दिलेल्या या आदेशाच्या अंमलबजावणीबाबत त्यांचेच चिरंजीव असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हा यातील महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

दीनदयाळ परिवाराचे समर्थन
अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करावे या खा.लोखंडे यांच्या मागणीस येथील दीनदयाळ परिवाराने जाहीर पाठींबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना इ-मेलद्वारे या पाठिंब्याचे निवेदन पाठवून अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी दिली. या संदर्भात सर्वपक्षीय समविचारींची बैठक लवकरच खा.लोखंडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवेदनात पुढे म्हटले आहे की, अहमदनगरचे नाव अंबिकानगर व्हावे ही अनेक वर्षापासूनची नगरकरांची मागणी आहे. केडगावची अंबिकादेवी ही नगर शहराची कुलदेवता आहे. आता लोकप्रतिनिधी असलेले खा. लोखंडे यांनीही नामांतराची मागणी केल्याने या मागणीला जोर आला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर अशा नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्याचप्रमाणे नगरचे नामांतर व्हावे यासाठी राज्य सरकारने अंबिकानगर या नामांतर मागणीचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनात आहे. या निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, प्रा.मधुसूदन मुळे, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे, सचिन पारखी, गौतम कराळे, बाळासाहेब खताडे, सदाभाऊ शिंदे, सोमनाथ चिंतामणी आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post