जिल्ह्यात शस्त्रबंदी आदेश जारी.. ग्रामपंचायत निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर आदेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) नुसार नगर जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात ७२१ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान येत्या १५ जानेवारीला होणार असून, त्याची मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे १९ जानेवारीपर्यंत शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळसीमेच्‍या हद्दीत 19 जानेवारी 2021पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहे. यात-शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तु बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, हे आदेश पुढील व्‍यक्‍तींना लागू होणार नाहीत. यामध्ये शासकीय सेवेतील व्यक्‍तींना, ज्यांना आपल्या वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्‍तींना शारीरिक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post