मृत वन्य पक्षी दिसल्यास संपर्क साधा; बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर आवाहन


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहर व परिसरात कुठेही वन्य पक्षी मृतावस्थेत आढळले तर त्यांना हात न लावता सुनील थेटे ९८५०७५१८९९ वा मंदार साबळे ९८९००८७०९३ यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे बर्ड फ्ल्यूबाबत योग्य त्या उपाय योजना करणे शक्य होईल, असे वन विभागाचे म्हणणे आहे. बर्ड फ्ल्यूबाबत पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणीही कुठल्याही अफवा पसरवू नयेत व नागरिकांमध्ये भीती पसरली जाईल, असे कृत्य करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित पक्षांची वन विभागाकडून नुकतीच पाहणी करण्यात आली. सध्या जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू सदृश आजाराचा शिरकाव झाला असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून नगरच्या वन विभागामार्फत जवळच्या तलावांवर आलेल्या स्थलांतरीत हिवाळी पाणपक्ष्यांवर लक्ष ठेवले जात आहे. उपवन संरक्षक आदर्श रेड्डी व सहायक वन संरक्षक एस. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे व निसर्गमित्र मंदार साबळे यांनी शुक्रवारी कापूरवाडी तलाव परिसरास भेट देऊन तेथील पक्ष्यांची पाहणी केली. यावेळी वनपाल देवीदास पातारे व हिरालाल परदेशी उपस्थित होते. दरम्यान, शहर व जिल्ह्यातही कोठे वन्य पक्षी मृतावस्थेत आहेत काय, याचीही माहिती वन विभागाद्वारे घेतली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post