जिल्हा बँक निवडणूक : भाजप नेत्यांची मंत्री थोरातांशी चर्चा; कर्डिले म्हणाले..


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीस भाजपचे नेते व माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व विवेक कोल्हे असे चौघेजण उपस्थित होते. बँकेच्या राजकारणात पक्षीय भूमिका बाजूला ठेवून सहमतीचा विचार करण्याचे त्यांचे यावेळी ठरल्याचे सांगितले जाते. या वृत्ताला माजी आमदार कर्डिले यांनीही दुजोरा दिला आहे.

मंत्री थोरात यांनी बोलावल्याने आम्ही त्या बैठकीस गेलो होतो. बँकेच्या आतापर्यंतच्या वाटचालीत भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले, काळे, कोल्हे, विखे यांनी पक्षीय राजकारण कधी आणले नाही. शेतकरी व कारखान्यांचे हित नेहमी पाहिले. हीच भूमिका याहीवेळी आहे. त्यामुळे आधी अर्ज दाखल करणे तसेच छाननीत काय होते ते पाहून त्यानंतर पुन्हा चर्चा करण्याचे ठरले आहे. 
त्यामुळे पुन्हा आम्ही भेटणार आहोत, असे कर्डिले म्हणाले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत कर्डिले, प्रा. राम शिंदे व राधाकृष्ण विखे या तिघांची समिती भाजपने केली आहे. येत्या ३० वा ३१ला आमची बैठक होऊन बँकेबाबत आम्ही चर्चा करणार असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आवश्यक तो निर्णय घेणार आहोत, असेही कर्डिलेंनी स्पष्ट केले. शेतकरी, कारखाने, कारखान्यांचे कामगार, छोटे व्यावसायिक यांच्या हितासाठी सहमतीची भूमिका आमचीही आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचा विषय हा महाविकास आघाडीअंतर्गत असल्याने त्यांचा त्यांनी विचार करावा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर छाननीत कोणाचे अर्ज राहतात व कोणाचे बाद ठरतात तसेच आणखी किती जागा बिनविरोध होऊ शकतात, यावर या निवडणुकीतील प्रमुख लढती तसेच पक्षीय भूमिका अवलंबून असणार असल्याचे दिसू लागले आहे

Post a Comment

Previous Post Next Post