अखेर भुजबळांवर पडली खाट.. पदावरुन उचलबांगडी


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहर काँग्रेसमधील मंत्री थोरात समर्थकांमधील सवतासुभा आता एका गटाला धोबीपछाड देऊन गेला आहे. शहरातील काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांची उचलबांगडी करून त्यांच्याजागी मनोज गुंदेचा यांची नवे ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने प्रदेश सरचिटणीस ॲड. गणेश पाटील यांनी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी तसेच नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष निवड मुंबईतून जाहीर केली आहे. मनोज गुंदेचा हे नगरचे ज्येष्ठ नेते व सहकार महर्षी दिवंगत सुवालाल गुंदेचा यांचे चिरंजीव आहेत. जैन ओसवाल पतसंस्थेच्या तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम सुरू आहे. त्यांचे वडील सुवालाल गुंदेचा यांना काँग्रेसने १५-२० वर्षांपूर्वी विधानसभेची उमेदवारीही दिली होती. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. पण त्यानंतर गुंदेचा परिवाराला शहर काँग्रेसमध्ये पदाधिकारी रुपाने स्थान मिळाले नव्हते. मात्र, आता मनोज गुंदेचा यांना ब्लॉक अध्यक्षपद मिळाले आहे.

शहर जिल्हा काँग्रेसची नवी कार्यकारिणी अशी- शहर जिल्हाध्यक्ष - किरण काळे, नगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष - मनोज गुंदेचा, शहर जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी- उपाध्यक्ष (५) - सय्यद खलील, अरुण धामणे, शेख निजाम जहागीरदार, अनंतराव गारदे व प्रा.डॉ. बापू चंदनशिवे. सरचिटणीस (४) - प्रा. डॉ. बाळासाहेब पवार, नलिनी गायकवाड, ॲड.चेतन रोहोकले व ॲड.अजित वाडेकर. सचिव (४) - अन्वर सय्यद, मुबीन शेख, प्रशांत वाघ पाटील व संजय मोरे. सहसचिव (४) - नीता बर्वे, शंकर आव्हाड, ॲड. सुरेश सोरटे व गणेश आपरे. खजिनदार (१) - मोहनराव वाखुरे. कार्यकारिणी सदस्य (५) - सिद्धेश्वर झेंडे, मंगेश शिंदे, डॉ.साहिल अहमद, सौरभ रणदिवे, किरण चव्हाण. विशेष निमंत्रित - दीप चव्हाण, रियाज शेख व अनिसभाई चुडीवाल.

'ती' पार्श्वभूमी टाळली
शहर काँग्रेसच्या कार्यकारिणीचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यकारिणीमध्ये खुल्या प्रवर्गाला ४५%, ओबीसीला ३०%, एससी समाजाला १३%, एसटी समाजाला ८%, तर एनटी समाजाला ४% जागा देण्यात आल्याचे सांगितले जाते. जुन्या-नव्यांचा मेळ घालत नवीन तरुण चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. यामध्ये दोन डॉक्टरेट पदाधिकाऱ्यांचा समावेश असून तीन वकिलांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, कामगार, व्यापार, सामाजिक, सांस्कृतिक आदी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना संधी देण्यात आली असून महिलांचा देखील समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एकाही व्यक्तीला स्थान देण्यात आलेले नाही, असेही आवर्जून सांगितले जाते.

Post a Comment

Previous Post Next Post