थोरातांची देशमुखांना चपराक? काळे गटाला झुकते माप


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगर शहर जिल्हा काँग्रेसमधील मंत्री थोरातांचे समर्थक असलेल्या शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे व ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्यामधील कुरघोडीच्या राजकारणाला वेसण घालताना मंत्री थोरातांनी भुजबळ गटाला शहराच्या नव्या पदाधिकारी नियुक्ती प्रक्रियेत पूर्ण डावलल्याचे दिसत असून,यानिमित्ताने भुजबळ गटाला ताकद देऊ पाहणारे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनाही यातून चपराक बसल्याचे दिसू लागले आहे.

शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील नगर शहराची नवी काँग्रेस कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून, यात नगर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी मनोज गुंदेचा यांना संधी देण्यात आली आहे. या पदावर याआधी बाळासाहेब भुजबळ काम पाहात होते. पण त्यांची यानिमित्ताने गच्छंती करण्यात आली आहे, शिवाय मुख्य कार्यकारिणीत किमान सल्लागार म्हणूनही त्यांना स्थान मिळाले नाही. मध्यंतरी विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी भुजबळ यांना प्रदेश कार्यकारिणीत घेण्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे आता त्यांच्या समर्थकांना आता प्रदेश संधीची आशा आहे.

दोनच दिवसात 'तो' निर्णय
शहर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी किरण काळे यांच्या नियुक्तीपासूनच काळे व भुजबळ गटात शीतयुद्ध सुरू होते. दोन्ही गटांचे कार्यक्रम व आंदोलनेही वेगळी होत होती. दोन दिवसांपूर्वी भुजबळ गटाने संक्रांती तीळगुळ वाटप कार्यक्रम घेतला व यात शहर जिल्हाध्यक्ष काळे यांच्यावर जोरदार टीका केली. या कार्यक्रमात प्रदेश सरचिटणीस देशमुख उपस्थित होते व त्यावेळी त्यांनी बोलताना, त्या बैठकीत व्यक्त झालेल्या कार्यकर्त्यांच्या भावना जशाच्या तशा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली होती. त्याचवेळी 'एएमएसी मिरर न्यूज पोर्टल'ने शहर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोनच दिवसात त्याची प्रचिती आली. प्रदेश काँग्रेसने शहराची नवी कार्यकारिणी जाहीर करताना भुजबळ गटाला व त्यांना ताकद देणाऱ्या देशमुखांनाही धोबीपछाड दिल्याचे मानले जात आहे. यासंदर्भात काळे समर्थकांचे म्हणणे आहे की, पक्षांतर्गत कुरघोडींची मागील दोन दिवसांपासून शहरामध्ये चर्चा सुरू होती. मकर संक्रांतीच्या दिवशी प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एका गटाची बैठक झाली होती. माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, शहर ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी या बैठकीत किरण काळे यांच्यावर टीका केली होती. यामुळे विखे भाजपमध्ये असून देखील विखे गट शहर काँग्रेसमध्ये आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या बैठकीनंतर बाळासाहेब भुजबळ यांचीच प्रदेश काँग्रेसने डच्चू देत उचलबांगडी केल्यामुळे या गटाचे नेतृत्व करणाऱ्या विनायक देशमुख यांना ही मोठी चपराक असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, मनोज गुंदेचा यांची ब्लॉक अध्यक्षपदी वर्णी लावून शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारत पक्षांतर्गत विरोधकांना विशिष्ट संदेश दिल्याचे मानले जात आहे. गुंदेचा यांच्या निमित्ताने शहरातील मोठ्या संख्येने असणाऱ्या जैन समाजाला काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले आहे. गुंदेचा यांची ब्लॉक अध्यक्षपदी वर्णी लागल्यामुळे काळे यांची शहर काँग्रेसवर एकहाती पकड असल्याचे व मंत्री थोरातांचे बळ काळे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post