काँग्रेसमधील संघर्ष शिगेला; काळेंसह तांबे पिता-पुत्रांवर टीका


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे व त्यांचे चिरंजीव प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे तसेच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे संकुचित आहेत, अशी टीका शहराचे माजी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या समर्थकांनी केली आहे. या तिघांविरुद्ध दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रारीचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, नगर शहर काँग्रेसमधील काळे-भुजबळ समर्थकांतील संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन दिवसांपूर्वी भुजबळ यांची ब्लॉक अध्यक्षपदावरून हकालपट्टी करून त्यांच्या जागी मनोज गुंदेचा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे शहरातील काँग्रेसच्या दोन गटात वादंग सुरू आहे. यात विशेष म्हणजे भुजबळ गटाने काळे आणि तांबे पिता-पुत्रांवर टीका करताना नगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविषयीच्या व्यक्तिद्वेषातून भुजबळ यांना टार्गेट केले जात असल्याचा दावा केला आहे. यामुळे काळे-भुजबळ या दोन काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधील वादंगाशी शहर राष्ट्रवादीचा असलेला संबंधही चर्चेचा झाला आहे.

अहमदनगर शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बाळासाहेब भुजबळ यांना हटवल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया नुकत्याच झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, चिटणीस मुकुंद लखापती, आर.आर.पाटील, रजनी ताठे, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविता मोरे, सुभाष रणदिवे,अज्जू शेख,अभिजित कांबळे,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, माजी नगरसेवक फैयाज शेख, बाळासाहेब पवार, निखिल वारे, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख आदींनी भुजबळ यांची पाठराखण करीत प्रदेश काँग्रेसने घेतलेल्या निर्णयाचा निषेध केला. आ. संग्राम जगताप यांच्याबद्दलच्या व्यक्तिद्वेषाने शिवसेनेच्या दावणीला काँग्रेस पक्ष बांधणाऱ्या किरण काळेंमुळे बाळासाहेब भुजबळांसारख्या निष्ठावान, सक्रिय कार्यकर्त्याला पद गमवावे लागले, अशी भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे याबाबत पक्षश्रेष्ठींपुढे दाद मागण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. नगर शहर पक्षाचे काम भुजबळ आणि प्रतिक्रिया देणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकसंधपणे, निष्ठेने व प्रामाणिकपणे केले. पक्षाचे कार्यक्रम शहरात राबवून पक्षाचे ध्येयधोरण व निर्णय तळागाळात पोहोचविले. गट-तट न मानता सर्वांना बरोबर घेऊन शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम केले. पक्षाचे काम करताना पक्षांतर्गत गटबाजीचा त्रास सहनही करावा लागला तरीही पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ यांनी २००३ पासून पदाहून हटविण्यापर्यंत म्हणजेच १६ जानेवारी २०२१ पर्यंत एकनिष्ठेने काम केले. राधाकृष्ण विखे पक्षात होते, तोपर्यंत पक्षाचे नेते म्हणून त्यांनी आयोजित केलेल्या पक्षांतर्गत उपक्रमाला भुजबळ यांनी पक्षहित म्हणून सहभाग घेतला. पण, त्यावेळी जिल्ह्यातील व शहरातील सर्वच पदाधिकारीही यावेळी असत. मात्र, विखे व अन्य कोणी जेव्हा पक्षातून बाहेर गेले, तेव्हा त्यांचे समर्थन भुजबळ यांनी केले नाही. उलट, पक्षाचे जे विखे यांच्या प्रचारात होते, त्यांच्यापासून दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न केला. थोरात यांच्या आदेशाचे पालन करून पक्षनिष्ठा वेळोवेळी सिद्ध केली.२०११ च्या दरम्यान पक्षाच्या तत्कालीन शहर जिल्हाध्यक्षांना निलंबित करण्याची घटना घडली. त्यादरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांना एकसंध ठेवून त्या काळात शहरात पक्षाचे अस्तित्व कायम राखण्याचे केलेले काम व शहरात पक्षाचे नेतृत्व केले, ही बाब कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहे, अशी भावना या बैठकीत व्यक्त केली गेली.

तांबेंवर टीका
सत्यजित तांबे २०१४च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून केवळ व्यक्तीव्देषाने पछाडले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा ते व्देष करीत आहेत. ते हे करीत असताना पक्ष सेना-भाजपच्या दावणीला बांधण्यासही ते मागे नाहीत. ही त्यांची कृती पक्षाला वेळोवेळी नुकसान करणारी ठरली आहे. मात्र, थोरात यांचे भाचे म्हणून त्यांच्या या पक्षविरोधी कृत्याची कोणी दखल घेतली नाही. पण, त्यांची कृती सर्वश्रुत होती आणि आहे, हे सिद्ध झाले आहे. तांबे पिता-पुत्राने स्वतः संकुचित वृत्तीने गटबाजी करायची आणि वर भुजबळांवर गटबाजीचा ठपका ठेवायचा, अशा त्यांच्या राजकारणाने शहरात पक्षात काम करण्यास पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण केल्या आहेत, अशी टीका या बैठकीत करण्यात आली. त्यात पुढे म्हटले की, मध्यंतरी किरण काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. काळे हे वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्षात कार्यरत होते. ते शहरातील विद्यमान आमदारांचे खास विरोधक म्हणून ओळखले जातात. तांबे यांचाही राग आमदारांवर आहे आणि काळे यांचाही. मग या समदुःखींनी काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्यांना अडचणी निर्माण केल्या आहेत. हा त्रास गेल्या ७-८ वर्षांपासून सतत सुरू आहे. तशा प्रकारचे लेखी पत्रही थोरातांना देण्यात आले. प्रांतिक कमिटीला याची कलपना आहे, परंतु आज प्रांतिक नेतृत्व याकडे डोळेझाक करीत आहे. वास्तविक प्रांतिक अध्यक्षांनी काळे यांची नियुक्ती करतांना भुजबळ यांनी शहरात पक्ष जिवंत ठेवण्याचा आवर्जून उल्लेख केला होता. एवढेच नाही तर प्रदेशच्या कार्यकारिणीत भुजबळ यांना घेण्याचे त्यांनीच सांगितले होते. विशेष म्हणजे हे त्यांनी तांबे गटाच्या कार्यक्रमात सांगितले होते. एकीकडे काळे यांची नियुक्ती करून काळे शिवसेनेच्या दावणीला पक्ष बांधत आहेत. त्या कृतीला तांबे पिता-पुत्राच्या पाठिंब्याला संमती देत दुसरीकडे निष्ठेने पक्ष कार्य करणाऱ्यांना पदावरून हटवण्यात येते, ही बाब शहरातील कार्यकर्ते अ.भा काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच.के. पाटील आणि वेळ पडली तर दिल्लीपर्यंत श्रेष्ठींच्या कानावर घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. मनोज गुंदेचा या व्यक्तीला विरोध नाही. तांबे पिता-पुत्र आणि काळे यांच्या कृतीला आणि त्यांच्या संकुचित वृत्तीला विरोध आहे. तो कायम ठेवून शहरात पक्ष कार्य एकसंध करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. भुजबळ हे पक्षांतर्गत निवडणुकीतून लागोपाठ २ वेळा शहर ब्लॉक अध्यक्ष झाले आहेत. ब्लॉकच्या निवडणुकीनंतर शहर जिल्हाध्यक्षपदाची निवड झाली. मात्र, २०११ पासून आजपर्यंत शहर जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून त्यांचीच नियुक्ती झाली आहे. भुजबळ यांनी केलेल्या पक्ष कार्याचा प्रदेश काँग्रेसने २०१० मध्ये विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे तर त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन २०१२ ला पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्याची संधी त्यांना देण्यात आली, असे नमूद करून पुढे म्हटले आहे की, मध्यंतरी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संगमनेरहून आलेल्या सत्यजित तांबे ह्यांनी शहराची उमेदवारी मिळविली आणि त्या दरम्यान शहरातील पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हापासून पक्षात स्वार्थीपणा, संकुचित वृत्ती आणि निष्ठावंतांना डावलून तांबे प्रेमींना महत्व प्राप्त करून देताना पक्षहित जोपासणारांच्या वाट्याला वनवास आला. तो आजपर्यंत सुरु आहे. मात्र तांबे यांची उमेदवारी हा पक्षादेश मानून भुजबळ आणि सहकाऱ्यांनी पक्षाचे काम इमानेइतबारे केले. तत्पूर्वीही विधानसभा निवडणुकीत सहकार महर्षी सुवालाल गुंदेचा उमेदवार होते त्यांचाही प्रचार करण्यास भुजबळ आघाडीवर होते. स्व.गुंदेचा , स्व.रईसा शेख तसेच सुभाष गुंदेचा, डी.एम. कांबळे, ब्रिजलाल सारडा, विनायक देशमुख आदी शहरातील पक्षाच्या ज्येष्ठ नेते-कार्यकर्त्यांनी भुजबळ यांची कायम पाठराखण करत त्यांना पदोन्नती (शहर जिल्हाध्यक्ष) पद देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. परवाच्या १४ जानेवारीच्या तिळगुळ सभारंभात भुजबळ यांच्या पाठीशी शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमुखी पाठिंबा जाहीर केला होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

गटबाजी तेच करतात
किरण काळे यांची शहर जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती होण्यापूर्वी बाळासाहेब भुजबळ यांची या पदावर नियुक्ती करावी, अशी मागणी शहरातून एकमुखी होती. परंतु काळे यांची निवड होताच भुजबळ यांनी काळे यांचे अभिनंदन करून दुसऱ्या दिवशीच्या १५ ऑगस्ट झेंडावंदन कार्यक्रमात उपस्थित राहून एकसंध पक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी काळे यांनी भुजबळ व पदाधिकाऱ्यांना झेंडावंदन कार्यक्रमास येण्यास मनाई केली. सत्यजित तांबे यांची परवानगी घेऊन कार्यक्रमाला या, असे त्यांनी बजावले. याचा अर्थ तुम्ही कालिका प्राईडच्या कार्यालयात किंवा आमच्या कार्यक्रमात सहभाग घेऊ नका, असे बजावल्याने भुजबळ यांनी शहर ब्लॉक अध्यक्ष म्हणून स्वतंत्र कार्यक्रम घेतले तर आ.तांबे यांनी भुजबळ गटबाजी करतात अशा चोराच्या उलट्या बोंबा मारल्या. मग गटबाजी कोण करते याचा खुलासा करावा, असे आव्हानही या बैठकीत देण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post