नेहरू पुतळा होर्डिंग्ज अतिक्रमण; सोमवारी होणार निर्णय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शहरातील सर्जेपुरा परिसरातील अप्पू हत्ती चौकातील लालटाकीवर असलेल्या पंडित नेहरूंच्या पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज मनपा हटवणार की नाही, याचा अंतिम निर्णय सोमवारी (११ जानेवारी) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत होणार आहे. दरम्यान, शहर जिल्हा काँग्रेसची भूमिका आक्रमक आहे. संबंधित होर्डिंग्ज हटवले जावेत, या मागणीवर काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे ठाम असून, १२ जानेवारीला त्यांनी बुलडोझरने संबंधित होर्डिंग्ज हटवण्याची भूमिका कायम ठेवली आहे व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांनाही शहर काँग्रेसची भूमिका सांगितली आहे.

नेहरू पुतळ्यासमोर रस्त्यावर जाहिरातीची चार होर्डिंग्ज असून, यामुळे पुतळा दिसत नाही. त्यामुळे हे होर्डिंग्ज हटवावेत, अशी मागणी शहर काँग्रेसची आहे. या चारपैकी एक होर्डिंग्ज संबंधित व्यावसायिकाने हटवले आहे व त्यावेळी महापालिकेचेही काही कर्मचारी तेथे होते. त्यामुळे आता राहिलेले तीन होर्डिंग्ज तातडीने हटवल जावेत, असे काळे यांचे म्हणणे आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक चर्चा केली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, कर विभागाचे उपायुक्त संतोष लांडगे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह मनपाचा उद्यान विभाग, विद्युत विभाग आणि संबंधित अधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये याविषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

पोलिस अधीक्षकांसमोर मांडली भूमिका
लालटाकी येथील नेहरू पुतळ्याभोवती उभारण्यात आलेल्या होर्डींग्सच्या विषयाबाबत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. यावेळी दीप चव्हाण, निजामभाई जहागीरदार, खलील सय्यद, अज्जूभाई शेख, नलिनीताई गायकवाड, नाथा अल्हाट, डॉ. प्रा. बापू चंदनशिवे, कौसर खान, अक्षय कुलट, चिरंजीव गाढवे, सुजित जगताप, अन्वर सय्यद, मुबीन शेख, प्रवीण गीते, प्रमोद अबुज, अमित भांड, अनिसभाई चुडीवाल, शरीफ सय्यद, नीताताई बर्वे, वाहिद शेख, प्रशांत जाधव, प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते. काँग्रेसने पंडित नेहरू पुतळ्याची आणि परिसराची झालेली दैनावस्था यावेळी पोलीस अधीक्षक पाटील यांच्यासमोर मांडली. होर्डिंग्जमुळे पुतळा झाकला गेला आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अशाच प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाची असून पोलीस यंत्रणेवर कोणताही ताण येऊ नये यासाठी मनपा प्रशासनाच्यावतीने सामंजस्याची भूमिका घेऊन होर्डिंग्ज काढत झालेली अक्षम्य चूक तातडीने दुरुस्त व्हावी, अशी भूमिका यावेळी काँग्रेसने मांडली. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काँग्रेस शिष्टमंडळाचे म्हणणे समजून घेत या विषयावर चर्चा केली. प्रशासन योग्य ती पावले निश्चितपणे उचलेल, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post