कॉंग्रेसमध्ये थोरात समर्थकात आता स्पष्ट फूट; देशमुखांचे आशीर्वाद?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विखे पिता-पुत्रांनी काँग्रेस सोडल्यावर जिल्ह्यात कॉंग्रेस एकसंध होईल, अशी अपेक्षा होती. ग्रामीण जिल्ह्यात तसे चित्र बऱ्यापैकी आहे. पण नगर शहर मात्र याला अपवाद ठरले आहे. नगर शहर काँग्रेसमध्ये थोरात समर्थकांमध्येच काळे व भुजबळ असे दोन गट झाल्याचे आता स्पष्ट दिसू लागले आहे. भुजबळ गटाने मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमात भुजबळ यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख यावेळी उपस्थित होते. शिवाय, या कार्यक्रमात शहरजिल्हाध्यक्ष काळे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका झाली व कार्यकर्त्यांच्या या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत जशाच्या तशा पोहोचवण्याची ग्वाही देशमुख यांनी दिल्याने त्यांचे छुपे आशीर्वाद तर या घडामोडींना नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नगर शहरात थोरात समर्थकांमध्ये दोन गट मागील दीड-दोन वर्षांपासून आहेत. त्यांच्यात किरकोळ वादही झडत असायचे. पण आता स्वतंत्र सवतासुभा झाला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी किरण काळे यांना शहर जिल्हाध्यक्ष केल्यानंतर नाराज झालेल्या दुसऱ्या गटाने म्हणजे ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ समर्थकांनी स्वतंत्र कार्यक्रमांद्वारे व आंदोलनांद्वारे आपले अस्तित्व राखले होते. मात्र, आता भुजबळ समर्थकांनी भुजबळ यांनाच शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची मागणी करून तसा ठराव केल्याने य़ावर मंत्री थोरात काय भूमिका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. मात्र, यानिमित्ताने शहर काँग्रेसमध्ये फारसे काही आलबेल नाही, हेही स्पष्ट झाले आहे.

भावना पोहोचवणार : देशमुख
कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठींपर्यंत जश्याच्या तश्या पोहोचविणार असल्याची ग्वाही प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांनी शहर काँग्रेसच्या तिळगुळ वाटप मेळाव्यात दिली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा नुसता पक्ष नसून ती एक स्वतंत्र विचारधारा आहे. ज्यामध्ये बारा बलुतेदार, बहुजन समाज एकत्रितपणे काम करतात. त्यातल्या त्यात नगर शहरात ख्रिश्चन, मुस्लिम,पद्मशाली,साळी,माळी,जैन अशा सर्व समाजांना बरोबर घेऊन काम करणारा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष टिकून आहे. जो काम करील त्याचा काँग्रेस पक्ष आहे.आज या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ज्या व्यथा मांडल्या, त्या जशाच्या तशा पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे काम मी पक्षाचा पदाधिकारी या नात्याने करणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी आवर्जून केले. मकर संक्रांतीनिमित्तच्या तिळगुळ वाटप मेळाव्यास पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाष गुंदेचा, भिंगार काँग्रेस अध्यक्ष ॲड.आर आर पिल्ले, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान उपस्थित होते. नेत्यांचे कार्यकर्ते बनण्यापेक्षा पक्षाचे कार्यकर्ते बना, असा सल्ला देशमुख यांनी दिला तसेच आगामी महापालिका निवडणुका आपल्याला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिंकायच्या असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे असल्याने त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठराव आणि टीका
पक्षाच्या या मेळाव्यात श्याम वागस्कर यांनी बाळासाहेब भुजबळ यांना शहर जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त करावे, असा ठराव मांडला त्याला अभिजीत कांबळे यांनी अनुमोदन देताच सभागृहात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी बोलताना गुंदेचा म्हणाले, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाण्याचे धोरण असल्याने आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. इंदिरा गांधींवरील निष्ठा असल्याने त्यांनी राबवलेल्या धोरणांचा आम्ही पुरस्कार केला. मात्र, इंदिराजी आणि राजीवजींच्या निधनानंतर पक्षात वेगळे राजकारण सुरू झाले. आज पक्षाची अवस्था बिकट आहे. साध्या कार्यक्रमाचे निमंत्रणही मिळत नाही. वास्तविक पाहता एक तीळ सातजणांनी वाटून खाण्याची परंपरा असताना, तिथे पाय ओढण्याचे काम आज सुरू आहे. मात्र आगामी काळात एकजूट दाखवावी लागणार आहे. तेव्हा ताकदीने बाहेर एकजूट दाखवा, बाकी व्यथा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवण्याचे काम विनायक देशमुख करतीलच, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी सध्याचे शहर जिल्हाध्यक्ष काळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नगर शहर, भिंगार काँग्रेस एका विचाराने काम करतात. मी भाषण करणारा नव्हे तर काम करणारा माणूस आहे. अनेकदा शहर जिल्हाध्यक्षपदाचा विषय येतो. मात्र, व्यक्तिशः नेत्यांपेक्षा काँग्रेसचे नेतृत्व चालविल्याने भक्कम फळी उभी राहिली आहे. अनेकदा भूलथापा देऊन कार्यकर्त्यांत चलबिचल निर्माण केली जाते. अनेकदा पक्ष अस्थिर केल्याचा आरोप केला जातो. काँग्रेस पक्ष हा १३५ वर्षाचा पक्ष आहे. मात्र वंचितमधून आलेले आम्हाला काँग्रेस पक्ष समजावून सांगतात, काँग्रेस पक्ष ऐऱ्यागैऱ्याचा नाही असे म्हणतात. मात्र तेच पक्षात ऐरेगैरे आहेत, म्हणून पक्षावर ही वेळ आली आहे, असा टोलाही भुजबळ यांनी मारला. या मेळाव्यात ॲड.आर आर पिल्ले, महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सविता मोरे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सरचिटणीस फिरोज शफी खान, ए.सी. विभागाचे ढोबळे, रूपसिंग दादा कदम, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या किरण अळकुटे, बाळासाहेब भंडारी, निखिल वारे, शशिकांत पवार आदींची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनी केले.यावेळी सलीम रेडियमवाले, निजाम पठाण, सागर जाधव, शारदा वाघमारे, मार्गारेट जाधव, सुमन काळापहाड, रजनी ताठे, डॉ. जाहिदा शेख, मीना घाडगे,ज्योती पाटोळे, प्रियंका गायकवाड, एमआय शेख, अज्जू शेख, अजय अवसरकर, मुकुंद लखापती, रवि सूर्यवंशी, परवेज अहमद, सुभाष रणदिवे, अनिल वराडे, संजय झोडगे, रजनी भोसले, ॲड. भिंगारदिवे, विवेक येवले, विजय आहेर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post