गो करोना गो.. शनिवारपासून नगर जिल्ह्यात १५ केंद्रांवर लसीकरण


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मागील २०२० वर्षाच्या मार्च महिन्यापासून जगभराला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या व्हेंटीलेटरवर ठेवणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी भारत देश सज्ज झाला आहे. येत्या शनिवारपासून (१६ जानेवारी) देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाणार आहे. नगर जिल्ह्यासाठी या लसीकरणासाठी १५ केंद्र करण्यात आले असून, तेथे लसीकरण करण्यासाठी ३९ हजार २९० डोस जिल्ह्याला मिळाले आहेत.

राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. केंद्र शासनाने राज्यातील लसीकरण केंद्रांची संख्या सुधारित केली असून आता 358 केंद्रांच्या माध्यमातून लस देण्यात येणार आहे. सुरुवातीला नगर जिल्ह्यासाठी २१ केंद्रे होती. पण ती आता १५ करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात सुमारे 8 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असून त्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. राज्यातील 358 केंद्रांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सुमारे 35 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. 16 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशव्यापी लसीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सीरम इन्स्टिट्यूटकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात 9 लाख 63 हजार लसींचे वितरण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यासाठी करोना लसीचे 39 हजार 290 डोस जिल्हा परिषदेत आले असून, ते शीतसाखळी उपकरणांमध्ये ठेवण्यात आले आहेत. येथूनच त्यांचे जिल्हा शल्य चिकित्सक व मनपा स्तरावर वितरण होणार आहे. जिल्हा परिषदेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, डॉ.दादासाहेब साळुंके यांनी कोरोना लसीचा पहिला साठा उतरवून घेतला व स्टोअरेज करण्यात आला. डॉ.सांगळे यांनी सांगितले की, 13 जानेवारीला पहाटे साडेतीन वाजता नगर जिल्ह्यासाठी 39 हजार 290 कोविड 19 लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. राज्य कुटुंब कल्याण केंद्र-पुणे या कार्यालयामार्फत हे डोस नगर जिल्ह्याला मिळाले असून ते 2 ते 8 डिग्री तापमानात ठेवण्यात आले आहेत. लाभार्थींच्या संख्येनुसार संबंधित केंद्रावर डोसेसचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा परिषदेतील डोस स्टोरेजसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून याठिकाणी विनित धुंदाळे, गिरीश धाडगे, किरण शेळके, सुनील सुंबे, इमरान सय्यद या आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post