काँग्रेसच्या इशार्यानंतर महापालिकेला आली अखेर जाग; नेहरू पुतळ्यासमोरचे एक होर्डिंग उतरवले


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

शहर जिल्हा काँग्रेसने लालटाकीवरील पंडित नेहरूंच्या पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज उतरवण्यासाठी बुलडोझर चालवण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेला अखेर जाग आली व अप्पू हत्ती चौकातील एक होर्डिंग्ज मनपाने उतरवले. यामुळे पंडित नेहरूंचा पुतळा रस्त्याने जाता-येताना थोडा दिसू लागला आहे. शहर जिल्हा काँग्रेसने मनपाच्या या कारवाईचे स्वागत केले, पण आणखी ३ दिवसात राहिलेले तीनही होर्डिंग्ज उतरवले गेले नाही तर मग १२ रोजी बुलडोझरद्वारे ते जमीनदोस्त करण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

लालटाकी येथील पंडित नेहरू पुतळ्यासमोरील होर्डिंग्ज काँग्रेस कार्यकर्ते १२ जानेवारीला जिजाऊ जयंती दिनी हटवतील, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी गुरुवारीच मनपातील ठिय्या आंदोलनाच्यावेळी दिला होता. त्यामुळे मनपाने तातडीने हालचाली करीत शुक्रवारी (८ डिसेंबर) दुपारी चार वाजेपर्यंत मध्यभागी असणारे एक मोठे होर्डिंग हटवले. गेल्या अनेक वर्षानंतर अशाप्रकारे होर्डिंग्ज उतरविण्याची कारवाई नगर शहरामध्ये मनपाच्यावतीने पहिल्यांदाच पाहायला मिळाली. शहर जिल्हा काँग्रेसने आठवड्यापूर्वीच मनपाला संबंधित होर्डिंग्ज हटवण्याची मागणी केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ठिय्या आंदोलन केले गेले व त्यात बुलडोझरचा वापर करून ते होर्डिंग्ज काढण्याचा इशारा दिला गेला होता. शहर जिल्हा काँग्रेसच्या या दणक्य़ाने मनपाला जाग आली व चारपैकी एक होर्डिंग्ज हटवले गेले. मात्र, होर्डिंग्ज हटविण्यास सुरुवात झाल्यामुळे अनेक वर्षांनंतर नेहरू उद्यानातील झाडे पुन्हा दिसू लागली आहेत. मात्र, अजूनही नेहरू पुतळा उर्वरित होर्डिंग्जमुळे पूर्णपणे दिसत नसल्यामुळे उर्वरित होर्डिंग्ज मनपा कधी हटविणार व नेहरू पुतळा कधी अतिक्रमणमुक्त होणार, याची नगरकरांना उत्सुकता आहे.

याबाबत शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाच्यावतीने मनपा प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो. मनपा अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. १२ तारखेपूर्वी उर्वरित सर्व होर्डिंग्ज काढून घेऊन पंडित नेहरू पुतळ्याचा श्वास मोकळा करावा. यात कोणतीही कसूर केल्यास नाईलाजास्तव काँग्रेस कार्यकर्ते बुलडोझरने उर्वरित होर्डिंग्ज हटविल्याशिवाय राहणार नाहीत, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post