पोलिसांनी करावे लागणार २६ हजारावर चार्जशीट; कोरोना काळातील गुन्हे निकाली काढण्याचे आव्हान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात मास्क न घालणाऱ्या, सोशल डिन्स्टन्स न पाळणाऱ्या, संचारबंदी असताना बाहेर फिरणाऱ्यांसह अशा प्रकारचे कायद्याचे उल्लंघन करणारांविरुद्ध नगर जिल्ह्यात तब्बल २६ हजार ७०० गुन्हे दाखल आहेत. या प्रत्येक गुन्ह्याचे स्वतंत्र चार्जशीट (आरोपपत्र) करून पोलिसांना ते न्यायालयात पाठवावे लागणार आहे. त्याचे नवे आव्हान जिल्हा पोलिस दलासमोर उभे ठाकले आहे.

मागील मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादूर्भाव सगळीकडेच वाढला. नगरही त्याला अपवाद नव्हते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजना प्रशासनाने हाती घेतल्या होत्या. लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते व संचारबंदीही लागू करण्यात आली होती. मेडिकल दुकाने, भाजी विक्रेते, किराणा दुकानदार या अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक वगळता अन्य दुकाने व व्यावसायिकांना दुकाने उघडणे व बंद करण्याच्या वेळा ठरवून दिल्या गेल्या होत्या. अशा काळात बाहेर फिरताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे होते, याशिवाय बाजारात वा अन्य़त्र कोठेही गेल्यास दोन व्यक्तींमध्ये किमान ३ ते ४ फुटाचे अंतर (सोशल डिस्टन्स) राखणे, संचारबंदीच्या काळात बाहेर न फिरणे, बनावट पासद्वारे फिरणे, दुचाकीवर केवळ एकच व्यक्ती, चार चाकीमध्ये तीनच व्यक्ती, दुकान वेळेआधी न उघडणे, वेळ संपली तरी सुरू न ठेवणे असे विविध नियम केले गेले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, दुकानदार-व्यावसायिक, संस्थांशी संबंधितांवर मुंबई पोलिस अॅक्ट १८८नुसार विविध पोलिस ठाण्यांतून गुन्हे दाखल करण्यात आले होते. दुचाकी व चारचाकी वाहनेही जप्त केली गेली गेली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात असे तब्बल २६ हजार ७०० गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे २०१९ वर्षाच्या तुलनेत २०२०मध्ये जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांची संख्या तब्बल जवळपास चौपट झाली. २०१९मध्य़े जिल्ह्यात सर्वप्रकारचे गुन्हे ११ हजार १९५ दाखल होते, या तुलनेत २०२०मध्ये तब्बल ४३ हजार ७९७ दाखल झाले व त्यात कोरोना काळातील गुन्हेच २६ हजार ७००वर आहेत. त्यामुळे ही गुन्ह्यांची संख्या मोठी दिसू लागली आहे. त्यामुळे आता जिल्हा पोलिस प्रशासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमून पहिल्या टप्प्यात कोरोना काळातील दाखल २६ हजार ७००वर गुन्ह्यांची न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व गुन्ह्यांचे स्वतंत्र चार्जशीट करावे लागणार असल्याने त्याचे काम सुरू केले गेले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असून, स्वतंत्र कर्मचाऱ्यांद्वारे कोरोना काळात गुन्हे दाखल झालेल्यांचा शोध सुरू केला गेला आहे. यापैकी काही परराज्यातीलही व्यक्ती असल्याने त्यांचा शोध जिकरीचा झाला आहे. पण या गुन्ह्यांचे चार्जशीट करण्याचे काम पोलिस प्रशासनाने प्राधान्यक्रमाने हाती घेतले आहे. दरम्यान, जिल्ह्यात दाखल गुन्ह्यांपैकी ६९ टक्के गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हे उघ़डकीस येण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे.

ते प्रमाणही झाले कमी
वाजवी कारणाशिवाय उशिराने गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिस ठाण्यांवर कारवाईचा इशारा पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिला होता. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, उशिराने गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण आता हळूहळू कमी होऊ लागले आहे. पोलिस ठाण्यांतून आता गुन्हे दाबण्याचे प्रकार कमी झाले आहेत. ऑक्टोबरअखेर २४५ गुन्हे उशिराने दाखल झाले होते, पण पोलिस अधीक्षकांच्या सक्त सूचनेचा परिणाम होऊन नोव्हेंबरअखेर ही संख्या ११२वर आली व डिसेंबर अखेर ९२वर आली आहे. याशिवाय आता अदखलपात्र गुन्हेही कमी होण्याच्यादृष्टीने पोलिस अधीक्षक पाटील यांनी पोलिस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत. रेकॉर्डवर जास्त गुन्हे दिसू नयेत म्हणून अनेक पोलिस ठाण्यांतून एनसी (अदखलपात्र) गुन्हा दाखल करण्याचे प्रयत्न होतात. पण तसे न करण्याचे तसेच मारहाण वा अन्य गंभीर गुन्हे एनसी न करता नियमितपणे दाखल करून रेकॉर्डवर घेण्याच्या व तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post