जरे हत्याकांड : दिसेल तेथे 'बाळ'ला पकडा; पोलिस ठाण्यांना आदेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा दिसेल तेथे त्याला पकडा, असे आदेश जिल्ह्यातील २१ पोलिस ठाण्यांना जारी करण्यात आले आहेत. पारनेर न्यायालयाने जिल्हा पोलिसांना बोठेविरोधात स्टँडींग वॉरंट काढण्याचे आदेश जारी केल्याने त्यानुसार पोलिसांनी आता जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना या वॉरंटची माहिती दिली असून, बोठेला पकडण्याचे आदेश दिले आहेत.

बोठेविरोधात स्टॅंडिंग वॉरंट न्यायालयात मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना या वॉरंटसंदर्भामध्ये माहिती देऊन आरोपी दिसल्यास तात्काळ पकडण्याचे आदेशही पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. जरे खून प्रकरणांमध्ये पाच आरोपींना अटक केल्यानंतर यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा अजूनही शोध लागलेला नाही. जिल्हा न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेत जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पारनेर न्यायालयामध्ये बोठे विरोधात स्टॅंडिंग वॉरंट मिळण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता, न्यायालयाने तो मंजूर केला आहे. त्यामुळे पोलिसांनी आता पहिले पाऊल उचलताना जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना याची माहिती देऊन बोठेचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. ३५-४० ठिकाणी फरार बोठेचा शोध घेऊनही तो सापडलेला नाही. म्हणून पोलिसांनी पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये मुख्य म्हणजे स्टँडिंग वॉरंट ऑर्डरचा विषय पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाच्या होता. आता स्टँडिंग वॉरंट जारी करूनही तो आढळून आला नाही तर पुढील न्यायालयीन प्रक्रियाही पोलीस प्रशासन करणार आहे. यामध्ये त्याला फरार घोषित करणे व त्याच्या संपत्तीला टाच लावणे असे प्रकार आहेत. स्टॅंडिंग वॉरंट मंजुरीनंतर जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पोलिस ठाण्यांना याबाबतची कल्पना देऊन आरोपी सापडल्यास अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व 21 पोलीस ठाण्याला जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने आदेश देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post