आम्ही खाल्लेय.. तुमीबी खावा; म्हैसेकर-भोसलेंचा कृतीयुक्त अनोखा संदेश


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बर्ड फ्लूच्या धास्तीने मांसाहार शौकिनांनी कोंबडीचे मटण (चिकन) व अंडी खाणे टाळणे सुरू केल्याने पोल्ट्री व्यवसाय डबघाईस येण्याच्या स्थितीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोठेही बर्ड फ्लू नाही, त्यामुळे चिकन व अंडी खाण्यास हरकत नाही, असा संदेश मांसाहार शौकिनांना देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्यमंत्र्यांचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी अनोखी कृती केली. या दोघांसह शासकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात चिकन व अंड्यांचा आस्वाद घेतला व मांसाहार शौकिनांनीही न घाबरता चिकन व अंड्यांचा आस्वाद घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले.

अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्ण सुरक्षित असल्याबाबत डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कृतीतून संदेश दिला.

देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत ते पूर्णतः सुरक्षित असल्याचा कृतिशील संदेश जिल्हावासियांना दिला.

राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्ल्यू आढळून आल्यानंतर पोल्ट्री व्यवसाय संकटात आल्याचे चित्र होते. बर्ड फ्ल्यूच्या प्रादुर्भावामुळे नागरिक चिकन खाण्याविषयी कचरत होते. त्यांच्या मनात असणाऱ्या भीतीमुळे या व्यवसायावरही परिणाम होऊन शेतीला पूरक व्यवसाय असणाऱा पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आला होता. मात्र, अशा अफवा आणि गैरसमज दूर कऱण्यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेल्या पुढाकाराला डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बी.एन शेळके, पोल्ट्री असोसिएशनचे डॉ. देवीदास शेळके, डॉ. उमाकांत शिंदे, शिवाजी शिंदे, विनय माचवे, रोहिदास गायकवाड, संतोष कानडे, दीपक गोलक, दत्तात्रय सोनटक्के, कानिफ कोल्हे, डॉ. एस. व्ही. कुकडे, अनिल झारेकर, विठ्ठल जाधव, गोरख शेळके आदी यावेळी उपस्थित होते. केवळ गैरसमज आणि अफवा यामुळे हा व्यवसाय अडचणीत येऊ नये, शेतीपूरक व्यवसायात पशूधनानंतर कुक्कुटपालनात जिल्हा आघाडीवर असल्याने त्याची घडी बिघडू नये यासाठी पोल्ट्री असोसिएशनने घेतलेला पुढाकार आणि त्याला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद कौतुकास्पद ठरला आहे.

कावळा पॉझिटीव्ह.. कोंबड्या नाहीत
जामखेड तालुक्यात मृतावस्थेत आढळलेला कावळा पॉझिटीव्ह आहे, पण जिल्ह्यात एकही कोंबडी पॉझिटीव्ह नाही. त्यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू नाही, असा दावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना केला. जिल्ह्यात २६१ कोंबड्या मृत झाल्या असून, त्यांचे २३ सॅम्पल्स पुणे व भोपाळ लॅबला पाठवले होते. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथील कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लू सदृश आजाराने झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने त्या परिसरात अलर्ट झोन करण्यात आला होता. पण या कोंबड्यांच्या मृत्यूचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मिडसांगवी व पाथर्डी परिसरातील अलर्ट झोन रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात बर्ड फ्लू नसला तरी पोल्ट्री व्यावसायिकांना आवश्यक स्वच्छता, कोंबड्यांचे आरोग्य व अन्य आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत व त्यांचे पालन होते की नाही, यावरही पशुसंवर्धन विभागाद्वारे लक्ष ठेवले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post