'त्याशिवाय' कामे होतात का? पालकमंत्र्यांचा लोकप्रतिनिधींना गंभीर सवाल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

"सात-बारा उतारा.. वारसा नोंदी.. रेशन कार्ड बदलून मिळणे.. पेन्शन.. अशी विविध कामे वरकमाई दिल्याशिवाय होतात काय, हे सांगा बरं?'', असा गंभीर सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींना केला आणि सभागृह शांत झाले. ठिकाण होते माऊली सभागृह व निमित्त होते जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीचे.. ''या समितीच्या बैठकीत फक्त चर्चा नकोत. लोकप्रतिनिधींनी आपल्या गावाच्या विकासात गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे, शासकीय योजनांचा फॉलोअप ठेवला पाहिजे. सारे शासनावर सोपवून उपयोग नाही. शासन हा सुस्त अजगर असतो व त्याला सतत डिवचावे लागते'', असेही त्यांनी यानंतर आवर्जून सर्वांना सुनावले. दरम्यान, याच बैठकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकारण्यांनाही त्यांनी फटकारले. ''नगर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण असूनही दुर्लक्षित आहे. विखे, काळे, कोल्हे, थोरात, राजळे अशा सर्वांनी आपली संस्थाने चांगली केली आहेत,'' असे भाष्य करून त्यांनी जोरदार खळबळ उडवून दिली. नगर शहर व जिल्हा म्हणून दुर्लक्ष केले गेले, पण ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यात अकोले तालुक्यासारखी चांगली पर्यटन स्थळे असल्याने त्यांचा त्यादृष्टीने विकास होण्याची गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर समारोप करताना पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना कानपिचक्या दिल्या. शाळा, अंगणवाडी, आरोग्य सेवा, स्मशानभूमी-दफनभूमी या प्रत्येक गावाच्या प्राथमिक गरजा परिपूर्ण आहेत की नाहीत, यावर लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे. शासकीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला पाहिजे. जे अधिकारी सहकार्य करीत नाहीत, त्यांच्या माझ्याकडे तक्रारी करा, असे आवर्जून सांगून ते म्हणाले, जिल्हा ५० टक्के बागायती व ५० टक्के जिरायती आहे. रस्त्यांचे मोठे जाळे जिल्ह्यात आहे व रस्त्यांचा मोठा प्रश्नही आहे. त्यांच्या कामांचे नियोजन केले आहे, पण ती कामे दर्जेदार होण्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

जगतापांच्या मागणीला विखेंचा पाठिंबा
मनपाच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून ५ कोटीच्या विशेष निधीची मागणी शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी केली होती. या मागणीला नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पाठिंबा दिला. जिल्हा नियोजनमधून यासाठी तरतूद होण्याची गरज त्यांनी मांडली. यावर उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अडचणी मांडल्या. जिल्हा नियोजनऐवजी शासनाकडून असा निधी मागवता येईल, असा सल्लाही दिला. पण पालकमंत्री मुश्रीफ यांनी तो धुडकावला व नाविन्यपूर्ण योजनेतून या वर्षी अडीच कोटी व पुढच्या वर्षी अडीच कोटी देशपांडे रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी देण्याची सूचना केली. या बैठकीत ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेचे अपग्रेडेशन, पुरेसा स्टाफ, स्मशानभूमी-दफनभूमीसाठी शासकीय जागांची उपलब्धता, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व्हेंटीलेटर सुविधा व तेथे नियमित वीजपुरवठ्यासाठी सोलर पॅनेल सुविधा अशा विविध मागण्यांसह ५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांची गावठाण हद्द २०० मीटरऐवजी ५०० मीटर करण्याचीही मागणी यावेळी झाली.घोड व कुकडी कालव्यांच्या वितरिकांच्या दुरुस्तीची मागणीही केली गेली.

Post a Comment

Previous Post Next Post