सेनेला एथिक्स राहिले नाहीत.. नामांतराचे त्यांचेच राजकारण : माजी मंत्री महाजनांचा दावा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

काँग्रेस व शिवसेना यांच्या विचारधारा टोकाच्या आहेत व पूर्व-पश्चिमेसारख्या आहेत. तरीही दोन्ही काँग्रेस व एमआयएम समवेत सेनेने सत्ता मिळवली म्हणजे सेनेकडे एथिक्स राहिलेले नाहीत. सेनेने विचारधारा बदलली आहे. त्यामुळे औरंगाबाद मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फक्त संभाजीनगर नामांतराच्या घोषणा करायच्या, पोस्टरबाजी करायची व शेवटी तडजोड करायची. आम्ही (शिवसेना) फक्त ओरडू, निवडणूक करून घेऊ, मग बघू व पुढे तुम्ही (काँग्रेस) म्हणाल तसेच करू, अशीच शिवसेनेची नामांतराबाबत भूमिका आहे, असा आरोप माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी येथे केला. नामांतरावरून सेनाच राजकारण करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन नगर येथे आले होते. यासंदर्भात त्यांनी घेतलेल्या बैठकीस खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे, पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, सचिन पारखी, दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

औरंगाबादच्या नामांतराचा विषय सध्या सुरू आहे. संभाजीनगरचे नामांतर आम्ही (भाजप) सत्तेत असताना झाले नाही. पण त्या वेळेस शिवसेनासुद्धा आमच्याबरोबर होती, हे त्यांनी लक्षात ठेवावे. संभाजीनगरचे नामांतर हे व्हायलाच पाहिजे. मात्र, यांना काही करायचं नाही. फक्त राजकारणासाठी हा विषय आणायचा आहे, असा आरोप महाजन यांनी केला. काँग्रेसने जरी याला विरोध केला असला तरी हा सुद्धा राजकीय भाग आहे. त्यामुळे महाविकास आघाडीवर याचा परिणाम होईल की नाही, हे सांगता येणार नाही,' असेही त्यांनी स्पष्ट केले. 'शिवसेनेने आमची साथ सोडली. आता आम्ही एकटे आहोत. त्यामुळे एकला चलो रे अशी आमची भूमिका आहे व ती पुढे आम्ही नेत आहोत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षावर नसतात. त्यामुळे कार्यकर्ते या निवडणुका लढवत असल्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी पक्ष पातळीवर नियोजन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेतला आहे,' असेही महाजन म्हणाले.

...तर राजकारणातून निवृत्ती
'तीन वर्षांपूर्वी झालेल्या घटनेसंदर्भात खोटी फिर्याद देऊन राजकीय आकसापोटी माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात माझी कोणत्याही खात्यामार्फत चौकशी करा, असे मी न्यायालयाला सांगितले आहे. जर मी एक टक्का जरी दोषी असेल तर मी राजकारणातून निवृत्ती घेईल व आमदारकीचा राजीनामा देईल,' असे स्पष्ट करून महाजन म्हणाले, '८ डिसेंबर 2018 रोजीची घटना तयार करून माझ्यावर गुन्हा दाखल केला. याचा बोलवता धनी कोण आहे, हे जळगाव जिल्ह्याला माहिती आहे,' असा टोला त्यांनी खडसे यांचे नाव न घेता लगावला. या प्रकरणामध्ये 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणासंदर्भात मी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा. चौकशी करून यातील सत्यता काय आहे, हे समोर येईल. एक टक्का जरी यात खरे निघाले, तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल,' असे महाजन म्हणाले. पोलिसांवर दबाव आणून खोट्या प्रकारची फिर्याद घेतली आहे. लवकरच याची सत्यता उघड होईल,' असे ते म्हणाले. 'कोणी कुठे जावे किंवा जाऊ नये, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे याबाबत आम्ही कोणाचे नावही घेणार नाही व मतही व्यक्त करायचे कोणतेच कारण नाही. त्यामुळे मी माझी प्रतिक्रिया दिली नाही,' असेही महाजन यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत स्पष्ट केले. त्यांचे नाव मात्र त्यांनी घेतले नाही. दरम्यान, इडी प्रकरणासंदर्भात मध्ये अनेकांच्या चौकशा सुरू झालेल्या आहे. या प्रकरणांमध्ये अगोदर चौकशी होते व दोषी असल्यानंतरच योग्य ती कारवाई केली जाते. त्यामुळे विनाकारण यामध्ये वक्तव्य करणे चुकीचे असते. ज्यांना ज्यांना हिशोब मागितला आहे, तो त्यांनी दिला पाहिजे,' असे महाजन म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post