ग्रामपंचायत निवडणूक : 'रणछोडदासां'ची मनधरणी जोरात


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोणतीही निवडणूक म्हटली की त्यात हौशे-नवशे व गवशे आवर्जून उतरतात. काहींना राजकारणात काहीतरी करून दाखवण्याची हौस असते, तर काहींना घराण्याच्या राजकारणाचा वारसा जपायचा असतो तर अनेकजण काही गवसते का (आर्थिक फायदा) होतो का, या प्रयत्नात असतात. अशा सगळ्यांच्या मनधरणीचा खेळ सध्या जिल्हाभरात रंगला आहे. जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे अंतिम चित्र सोमवारी (४ जानेवारी) स्पष्ट होणार आहे. किती ग्रामपंचायती बिनविरोध होतात, प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कितीजण राहतात व निवडणूक रिंगणातून किती रणछोडदास (माघार) घेतात, हे सोमवारी निश्चित होणार आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, श्रीरामपूरचे आमदार लहु कानडे व अन्य काही लोकप्रतिनिधींनी बिनविरोध ग्रामपंचायतींना विशेष विकास निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या घोषणांना कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणेही उत्सुकतेचे असणार आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी २३ हजार ८०३जणांनी उमेदवारी दाखल केली होती. यापैकी ६१९जणांचे अर्ज विविध कारणाने बाद झाले. आता २३ हजार १७८जणांचे अर्ज रिंगणात आहेत. यापैकी कितीजण माघार घेतात व प्रत्यक्षात कितीजण निवडणूक लढवतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदान १५ जानेवारीला व मतमोजणी १८ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर गावा-गावातील सरपंच पदांची आरक्षणे काढली जाणार आहेत. त्यामुळे सध्या तरी निवडणूक रिंगणात उतरलेल्या प्रत्येकाला आधी ग्रामपंचायत सदस्य कसे होता येईल, याचेच वेध लागले आहे. त्यामुळे आपल्या विरोधात उभे राहिलेल्यांपैकी कोण माघार घेऊ शकतो, अशांना गाठून त्यांची मनधरणी करण्याचे काम मागील दोन दिवसांपासून सुरू आहे. या कामाला किती यश येते, हे सोमवारी दुपारीच स्पष्ट होणार आहे. रणछोडदासांवरच आता नव्या ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वप्नांचे इमले अवलंबून आहेत. ग्रामीण भागात दोन दिवसांपासून बैठकांवर बैठका व चर्चांवर चर्चा झडत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post