नगरच्या 'आदर्श' पवारांना धक्का.. विरोधात उभे राहिले पॅनेल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्याच्या राजकारण-समाजकारणात पवार नावाला मोठे वलय आहे. बारामतीचे पवार राजकारण-समाजकारणात अग्रेसर आहेत, तसे नगरचेही पवार ग्रामविकासात लौकिक कमवून आहेत. पण या नगरच्या आदर्श पवारांच्या लौकिकाला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष व नगर तालुक्यातील आदर्शगाव असलेल्या हिवरे बाजारच्या उभारणीत रक्ताचे पाणी केलेल्या पोपटराव पवारांच्याविरोधात ग्रामपंचायतीत परिवर्तन ग्रामविकास पॅनेल उभे ठाकले आहेत. अर्थात पोपटरावांविरोधात दंड थोपटून उभी राहिलेली ही मंडळी त्यांच्या भावकीतीलच आहेत. मात्र, यामुळे आदर्शगाव हिवरेबाजारने मागील ३० वर्षांपासून जपलेली बिनविरोध ग्रामपंचायत ही परंपरा यंदा खंडित झाली आहे. त्यामुळेच आता हिवरे बाजारची निवडणूक नुसती गावपातळीवरच नव्हे तर देशविदेशातही गाजणार आहे. दरम्यान, विरोधातील परिवर्तन ग्रामविकास पॅनेलच्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन गावात प्रचारादरम्यान आमच्यावर दहशत होण्याची शक्यता असल्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सोशल मिडियाद्वारे हा चर्चेचा विषय झाला आहे.

यंदा हिवरे बाजारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. याआधी १९८५मध्ये हिवरे बाजारमध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर १९८९पासून या गावाची ग्रामपंचायत निवडणूक सलग सहा वेळा बिनविरोध झाली. २०२१मध्ये मात्र या परंपरेला तडा गेला आहे. सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत रणधुमाळीत नेहमीप्रमाणे हिवरे बाजारची निवडणूक बिनविरोध होईल, असा कयास होता. पण तो मोडीत निघाला. या ग्रामपंचायतीच्या ७ जागांसाठी परिवर्तन ग्रामविकास पॅनेलच्या सुजाता संबळे, आदिनाश पवार, शिल्पा पवार, सागर ठाणगे, सारिका खरात व किशोर संबळे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. शिल्पा पवार यांनी दोन जागांवर उमेदवारी दाखल केली आहे. मागील ८-१५ दिवसांपासून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावात बैठका व चर्चा सुरू होत्या. पण विरोधी पॅनेलच्या उमेदवारांनी त्याला भीक घातली नाही व अर्ज माघारीच्या दिवशी ही मंडळी माघार घेतील, अशीही आशा होती. पण तीही फोल ठरली. अखेर ३० वर्षांनी आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये निवडणुकीचा फड रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या पोपटराव पवार यांच्या विरोधात दुसरे मंडळ उभे राहिल्याने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.

पोलिसांना दिला अर्ज
हिवरे बाजार ग्रामपंचायतीत आदर्श सरपंच पोपटराव पवारांच्या विरोधात उभे ठाकलेल्या परिवर्तन ग्रामविकास पॅनेलच्या सहा उमेदवारांसह काहीजणांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची सायंकाळी भेट घेतली व निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय विरोधकांकडून जीवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. गावच्या विकासासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत, पण स्वतंत्र पॅनेल उभा केला म्हणून गावातील राजकीय विरोधकांकडून विरोध होत आहे, आम्हाला धमकावले जात आहे. यावरून आमच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो व प्रचारादरम्यान राजकीय वाद उपस्थित करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावाही या सर्वांनी पोलिस अधीक्षक पाटील यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. आम्ही पॅनेल उभा केल्याने गावातील राजकीय विरोधकांच्या मनात राग निर्माण झाला आहे व तशा पद्धतीने गावामध्ये चर्चा घडवून आणली जात आहे. त्यामुळे निवडणूक प्रचार काळात व पुढे सरपंच-उपसरपंच निवड होईपर्यंत आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post