'त्याबाबत' शरद पवार बोलणार आरोग्यमंत्र्यांशी!


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहरातील १३ बड्या रुग्णालयांनी करोना काळात रुग्णांवर उपचार करताना भरमसाठ बिले आकारल्याने त्यांच्यावर कारवाईबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणार आहे. तसा शब्द त्यांनी नगर शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे शहरातील त्या १३ रुग्णालयांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

कोरोना काळात १३ रुग्णालयांनी रुग्णांकडून १ कोटी १३ लाखाची वाढीव बिले घेतली आहेत. हे पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व मनपाने त्या रुग्णालयांना दिले आहेत. पण अजून कोणीही त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मनसेने शरद पवारांच्या नगर दौऱ्याच्यावेळी या रुग्णालयांची नावे व त्यांच्याकडून येणे असलेल्या रकमेचे फ्लेक्स शहरात लावून हे पैसे पवारांनी रुग्णांना मिळवून देण्याची मागणी करण्याचे ठरवले होते. पण जिल्हाधिकाऱ्यांनी ते पैसे रुग्णांना मिळवून देण्याचा शब्द दिल्याने मनसेने फ्लेक्स आंदोलन मागे घेतले. पण रविवारी पवारांच्या दौऱ्यात त्यांना भेटून या मागणीचे निवेदन दिले तसेच संबंधित रुग्णालयांची नावे व त्यांच्याकडून येणे रकमेची माहितीही त्यांना दिली.

मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे,शहराध्यक्ष गजेन्द्र राशिनकर,महिला जिल्हाध्यक्ष अॅड. अनिता दिघे यांनी आ. संग्राम जगताप यांच्या निवासस्थानी पवार यांना भेटून निवेदन दिले.

यासंदर्भात भुतारे सांगितले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने खा. पवार यांना कोरोना आजारामुळे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना वाढीव रकमेची बिले आली होती व ही वसुलीपात्र रक्कम शहरातील संबंधित हॉस्पिटलकडुन वसुलीचे आदेश महापालिकेने देऊनदेखील संबंधित हॉस्पिटलने कोरोना रुग्णांच्या खात्यावर जमा केली नसल्याचे पवारांना आम्ही सांगितले. कोरोना आजारावर शासनाने घालुन दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन शहरातील खासगी हॉस्पिटलने 1 कोटी 13लाख रुपये बिलांची जादा आकारणी केली असे उपजिल्हाधिकारी समितीने आपल्या अहवालात नमुद केले आहे. गोरगरीब रुग्णांचे वाढीव बिलांचे पैसे परत मिळण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना देखील निवेदन दिल्याचेही त्यांना सांगितले. आजपर्यंत या सर्व हॉस्पिटलने वाढीव बिलांची जादा रक्कम परत दिली नसल्यामुळे ही बिलांची रक्कम तुम्हीच परत मिळवुन द्या व तुम्हीच तुमच्या संबंधित मंत्री यांना यात लक्ष घालायला लावा, अशी विनंती केली त्यावर खा. शरद पवार म्हणाले की, मी आरोग्यमंत्री यांच्याशी या विषयावर बोलतो व गोरगरीब जनतेचा हॉस्पिटलच्या वाढीव बिलाचे पैसे परत करण्याचा प्रश्न मार्गी लावून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे भुतारे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post