चर्चा नामांतराची : इतिहास संशोधक म्हणतात.. नुसते 'नगर' संबोधणे अयोग्य


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या विषयासमवेत दुसरीकडे अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचा विषयही चर्चेत असताना दुसरीकडे इतिहास संशोधकांनी मात्र अहमदनगर हेच नाव योग्य आहे व 'अहमदनगर'ऐवजी फक्त 'नगर' म्हणणे चुकीचे आहे, असे मतही आवर्जून मांडले आहे. येथील इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी हे मत व्यक्त केले आहे.

औरंगाबाद-संभाजीनगर आणि अहमदनगर-अंबिकानगर अशा दोन नामांतराचा विषय राजकीय विश्वात गदारोळ उडवत आहे. अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेचेच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. त्या मागणीचे पुढे काय होईल, हे भविष्यकाळ ठरवेलच, पण दुसरीकडे इतिहास संशोधक मात्र या नामांतराऐवजी जे नाव आहे, तेच योग्य पद्धतीने घेतले जावे, असे मत व्यक्त करीत आहेत. अहमदनगर या नावाबाबत प्रा. वाव्हळ यांनी काही ऐतिहासिक ग्रंथाचे दाखले दिले आहेत व ब्रिटीश काळात अहमदनगरचे नाव नगर असे इंग्रजांनी वापरणे सुरू केल्याचाही दावा केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना प्रा. वाव्हळ म्हणतात, अहमदनगरला 'नगर' संबोधणे अयोग्य आहे. सय्यद अली तबातबाई हा सुप्रसिद्ध ऐतदेशीय इतिहासकार अहमदनगरच्या संस्थापक राजाने अहमदनगर इतक्या सुंदर पध्दतीने वसविलेले पाहून पुढीलप्रमाणे निरीक्षण 'बु-हाणे माशिर' या आपल्या ग्रंथात नोंदविले. "अहमदनगरने शोभा आणि सौंदर्य याबाबतीत बगदाद व कैरो या शहरांना मागे टाकले आहे". इतक्या छान पध्दतीने शहर वसविणाऱ्या संस्थापक अहमद निजामशहाचे आपण खरं तर सदैव ऋणी राहायला हवे. परंतु आता तर आम्ही त्यांचे नाव टाकून द्यायला तयार झालोत. हा केवढा कृतघ्ज्ञपणा. अहमदनगर शहर खरं तर एका विजयाचे स्मारक आहे. अशक्यप्राय विजय संपादून त्याच जागेवर शहराचा पहिला पाया रचला गेला. कोटबाग निजाम म्हणजेच भूईकोट किल्ला हा या शहराचा प्रारंभ होय. पुढे किल्ल्याजवळील नालेगाव, माळीवाडा, चाहुराणा या सारख्या तत्कालीन छोट्याछोट्या शहरांना सांधून राजधानीचे वैभवशाली शहर आकाराला आले. येथे शाही राजवाडे बांधले गेले. आखीव-रेखीव सुंदर शहर वसविले. या शहराचे रस्ते काटकोनात एकमेकांना छेदतात. मुबलक पाणी असे सुनियोजित शहर वसले गेले. अहमद निजाम उल्क मुल्क बहिरी आणि त्यांच्या पुढील कर्तबगार वारसदारांनी त्यात आणखी भर टाकली. म्हणून तर या शहराला 'अहमदनगर' संबोधले गेले, हा त्या निजामशाही सुलतानाचा सन्मान ठरतो, असे स्पष्ट करून प्रा. वाव्हळ यांनी पुढे म्हटले आहे की, अहमदनगरऐवजी "नगर" हा शब्दप्रयोग ब्रिटीश काळात सुरू झालेल्या साधनात आढळतो. निजामशाही, मोगल, हैदराबाद निजाम यांच्या राजवटीत अहमदनगरच उल्लेख येतो. मात्र, पुढे काही लोकांच्या लेखनात अहमदनगरचा उल्लेख नगर असा येतो. पुढे प्रिंट मिडियाने जागेअभावी तर काहीवेळा जाणतेपणाने वा अजाणतेपणाने नगरच नोंदवले. नगरकर आडनाव मराठेशाहीत आढळले. परंतु ब्रिटीशकाळात नगरच उल्लेख जास्त येतो. असे असले तरी इंग्रज व इतर परकीय युरोपीयन 'नगर' लिहीत नाहीत. धार्मिक सहिष्णूतेचे ढोल बडवायचे, तेच लोक अहमदनगर ऐवजी नगर वापरतात. यासंदर्भात शेकडो पुरावे इतिहासाच्या पानोपानी दिसतील. दहा वर्षापूर्वी श्री. शेख नावाचे प्रायमरी शिक्षक भेटले. त्यांनी अहमदनगरचे नाव सर्व शासकीय स्तरावर उल्लेख करताना अहमदनगर वापरावे यासाठी वैयक्तिक पातळीवर शासन दरबारी फार चिकाटीने प्रयत्न चालवल्याची भली मोठी फाईल दाखविली. त्यासाठी त्यांनी मनापासून तळमळीने प्रयत्न केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले लेखी आदेश त्यांच्याकडे होते. त्यामुळे त्या शिक्षकाला सलाम करायला हवा. 'अहमदनगर'चा 'नगर' असा उल्लेख करून या शहराच्या संस्थापकाला अनुल्लेखाने मारण्याचे पाप तर आपण करत नाहीत ना? अनुल्लेखाने मारणाराचा एक वर्ग सतत गोपनीय पध्दतीने कार्यरत असतो. तो शांत डोक्याने, धूर्तपणे आणि मुत्सद्दीबाण्याने हेतु साध्य करतो. हे सर्व थांबले पाहिजे असे वाटते. 

या पार्श्वभूमीवर-विकीपिडियाचा जावई शोध.. म्हणे " नगर हे अहमदनगरचे 'टोपण नाव' आहे". ज्यांनी ज्यांनी आधुनिक काळात अहमदनगरवर लिखाण केले, त्यांनी कळत नकळत अहमदनगरला 'नगर' संबोधले. अहमदाबादेचा किंवा औरंगाबादेचा उल्लेख सुरुवातीचे नाम वगळून केलेला आढळत नाही. मग अहमदनगरचाच नगर उल्लेख का? असा सवालही यानिमित्ताने प्रा. वाव्हळ (9881827834) यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post