जरे हत्याकांड : बोठेविरोधात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पुरेसा शोध घेऊनही रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे सापडत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध स्टँडींग वॉरंट मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. जरे हत्येचा गुन्हा पारनेर तालुक्यातील सुपे पोलिस ठाण्यात दाखल असल्याने पारनेर न्यायालयात पोलिसांनी हा अर्ज केला आहे व त्यावर सोमवारी न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून होऊन तब्बल महिना झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाचजणांना पकडले असले तरी त्यांना या हत्येची सुपारी देणारा पत्रकार बाळ बोठे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही. आरोपी बोठेसंदर्भामध्ये आतापर्यंत पोलिसांनी अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला आहे. नगर जिल्हा तसेच बाहेरच्या जिल्ह्यातसुद्धा शोध घेतला आहे. 40 हून अधिक ठिकाणी पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. दरम्यानच्या काळात तपासात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागलेले आहेत. तसेच बोठेशी संबंधित अनेकांचे जबाब घेण्यात आले आहेत. मात्र, बोठे सापडल्याशिवाय रेखा जरे यांच्या हत्येमागचे कारण स्पष्ट होणार नसल्याने त्याचा शोध पोलिसांसमोर आव्हानात्मक झाला आहे. त्यामुळेच पोलिसांनी आता त्याच्याविरुद्ध स्टँडींग वॉरंट मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्याचे पाऊल उचलले आहे. जरे यांच्या खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेला तपास व गोळा केलेले पुरावे तसेच घटनेच्या अनुषंगाने सर्व माहिती या अर्जाद्वारे न्यायालयास देण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारी सुनावणीनंतर न्यायालय या अर्जावर काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पोलिसांना स्टँडींग वॉरंटच्या आधारे बोठेचा राज्यात व राज्याबाहेरही शोध घेता येणार आहे. न्यायालयाचे हे वॉरंट सर्व पोलिसांपर्यंत पोहोचवले गेल्यानंतर जेथे कोठे तो दिसेल, तेथील पोलिसांना त्याला पकडता येणार आहे. याशिवाय बोठेसंदर्भात कोणाला काही माहिती असल्यास ती पोलिसांना देण्याबाबतचे आवाहन त्याचा फोटो व माहितीच्या आधारे पोलिसांना करता येणार आहे. त्यामुळे पोलिसांचेही सोमवारच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. 

न्यायालयाने बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. पण अद्यापपर्यंत बोठे याचा शोध लागलेला नाही. घटनेला आता एक महिना उलटून गेला, तरीही बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी दुसरीकडे खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. याअगोदर पोलिसांनी जरे यांच्या घराची झडती घेतली आहे. यामध्ये अनेक गोष्टी पोलिसांच्या हाती आल्या आहे. त्यामध्ये महत्त्वाचे असे रेखा जरे यांनी लिहिलेले चार पानी पत्र तसेच एक महत्त्वाचे डॉक्युमेंट तसेच काही फोटो सुद्धा पोलिसांच्या हाती लागले असल्याचे सांगितले जाते. आरोपी बोठेच्या घराची झडती पोलिसांनी अगोदर घेतलेली आहे. या ठिकाणी मोबाईलसह विविध वस्तू पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत. त्यातून मिळालेली माहिती तसेच बोठेशी संबंधित व सहकाऱ्यांच्या घेतलेल्या जबाबातून मिळालेल्या माहितीची सांगड घालण्याचे काम पोलिसांचे सुरू आहे. न्यायालयाकडून स्टँडींग वॉरंट मिळाल्यावर बोठेच्या शोधाला अधिक वेग येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post