वेळप्रसंगी शरद पवारांशी चर्चा करु; पण 'त्या' प्रश्नात राजकारण नको : सुजय विखे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

लष्कराच्या केके रेंज या सराव क्षेत्राच्या भूसंपादनावरून व त्याच्या श्रेयवादावरून राजकारण होत असल्याने त्याला कंटाळून नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन केके रेंजबाबतच्या एका मुद्द्याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेण्याची तयारी दर्शविली आहे. खुद्द डॉ. विखे यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. 

केके रेंज भूसंपादनावरून मध्यंतरी गरजेपेक्षा जास्त राजकारण झाले, यातील काही गोष्टी सोडवण्याच्या मार्गावर मी होतो. पण शेतकऱ्यांपर्यंत व्हॉटसअपच्या माध्यमातून अफवा पसरवल्या गेल्या व त्यात मूळ प्रश्न मागे राहिला. राजकारण त्यात आले. त्यामुळे श्रेयवादात न पडता पवारांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटत असेल तर आपण तसे करू, पण या विषयाला पक्षीय रंग देणे योग्य नाही, असे भाष्य त्यांनी केले. 

पवारांना भेटून त्यांच्याशी चर्चा करावयाच्या मुद्याबाबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, पारनेर, राहुरी व नगर या तीन तालुक्यांतील गावांचा हा प्रश्न आहे. पारनेरमधील ७५ टक्के, राहुरीतील ५५ टक्के व नगर तालुक्यातील ६५ टक्के शेतकऱ्यांनी न्यायालयात हा विषय नेण्याच्या माझ्या भूमिकेला सहमती दाखवली आहे. केके रेंज लष्करी सरावासाठी या तिन्ही तालुक्यांतील २३ गावांच्या जमिनींचे भूसंपादन लष्कराकडून होणार नाही, पण जमीन वापर होणार आहे. त्यामुळे या वापराचा मोबदला मिळावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यांनी ती नामंजूर केली आहे. त्यामुळे या मुद्यावर न्यायालयात जाता येऊ शकते व याच मुद्यावर मार्गदर्शन घेण्यासाठी पवारांची भेट आपण दिल्ली अधिवेशनाच्या काळात घेणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post