कुष्ठधाम रस्ता होणार मॉडेल रस्ता, अंडरग्राऊंड केबलसाठी सव्वा दोन कोटी मंजूर


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

मनपाच्या कर संकलनात नेहमीच आघाडीवर असलेल्या सावेडीकरांना खूषखबर मिळाली आहे. सावेडीतील प्रमुख रस्ता असलेल्या तोफखाना पोलिस चौकी ते भिस्तबाग चौकपर्यंतचा (कुष्ठधाम रस्ता) रस्ता मॉडेल रस्ता होणार आहे. या रस्त्यावर महावितरणच्या अंडरग्राऊंड केबलसाठी (भूमिगत वीजपुरवठा) योजनेसाठी २ कोटी ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत. 

शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या योजनेसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यास त्यांनी मान्यता दिली असून, अंतिम प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनीही दिली आहे. वर्षभरात हे काम करण्याची मुदत असून, महावितरणद्वारे कुष्ठधाम रस्त्यावरील मनपाच्या पथदिव्यांना भूमिगत वीजपुरवठा केला जाणार आहे. 

सावेडीतील महत्त्वाचा रस्ता असलेल्या कुष्ठधाम रस्त्यावर विविध शासकीय कार्यालये, मनपाची कार्यालये, शाळा, व्यापारी संकुलांसह व्यावसायिक आस्थापना आहेत. सावेडीतील हा महत्त्वाचा रस्ता असून, सावेडी परिसरात जाण्या-येण्यासाठी याच रस्त्याचा जास्त वापर नागरिकांकडून होतो. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेद्वारे हाती घेण्यात आले आहे. या रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे व झाडे हटवली गेली असली तरी विद्युत पोल हटवणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे आ. संग्राम जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर अंडरग्राऊंड केबलचा पर्याय समोर आला व तसा प्रस्ताव महावितरणने तयार केल्यावर आ. जगताप यांनी पालकमंत्र्यांकडे या योजनेसाठी निधीची मागणी केली. त्यास त्यांनी मान्यता दिल्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनीही प्रशासकीय मान्यता दिल्याने लवकरच काम सुरू होणार आहे.

'ती' महत्त्वाची अट
सावेडीतील कुष्ठधाम रस्त्यावरील अंडरग्राऊंड केबलसाठी २ कोटी ३० लाख ८० हजार ४१५ रुपये मंजूर झाले असले तरी या योजनेच्या अंमलबजावणीत एक महत्त्वाची अट असून, या कामाचे तुकडे पाडून हे काम केले जाऊ नये, असे प्रशासकीय मान्यतेत आवर्जून बजावण्यात आले आहे. मनपाची बहुतांश मोठी विकास कामे अशीच लहान-लहान तुकडे पाडून म्हणजे १० लाखाचे काम प्रत्येकी २ लाखाचे ५ ठेकेदारांना देण्यासारखे प्रकार नेहमी होतात. या पार्श्वभूमीवर हे काम तुकडे न पाडता होणार आहे. मनपाकडून देखभाल दुरुस्तीची हमी, बांधकाम ना-हरकत दाखला, कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक करून त्याला मान्यता व कामाची जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष समितीद्वारे होणारी नियमित तपासणी अशाही अन्य काही अटी आहेत.

नगरआधी सावेडीला संधी
जुन्या नगर शहरात शिवजयंती, गणेश विसर्जन तसेच मोहरम कत्तल की रात व ताबूत विसर्जन अशा चार मिरवणुकांच्या मार्गावर अंडरग्राऊंड वीजपुरवठ्याची योजना सुमारे ८-१० वर्षांपासून चर्चेत आहे. पण तिला अजूनही प्रत्यक्षात यायला मुहूर्त लाभलेला नाही. या योजनेंतर्गत रोहित्रे उभारण्यासह अन्य मोठी कामे महावितरणने केली आहेत. पण प्रत्यक्ष मिरवणूक मार्गावर अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेपासह अतिक्रमणे व अन्य अडचणी असल्याने ही योजनाच आता बासनात गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नगरमधील पहिला अंडरग्राऊंड वीजपुरवठ्याचा प्रकल्प राबवण्याची संधी सावेडीला मिळाली आहे व कोणताही राजकीय वा अन्य अडथळा न येता किमान हा तरी पूर्ण होईल, अशी आशाही आहे.

Post a Comment

Previous Post Next Post