चर्चा नामांतराची : मनसेचा औरंगाबादच्या नामांतरास पाठिंबा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यात सध्या औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याचा विषय गाजत आहे व त्यापाठोपाठ अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचाही विषय चर्चेत आला आहे. पण नगरच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अहमदनगरच्या नामांतर विषयाकडे दुर्लक्ष करून औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय अजेंड्यावर घेतला आहे व यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना १० हजार पत्रे पाठवून त्यात फक्त 'छत्रपती संभाजी महाराज की जय' अशी घोषणा लिहिण्याचे अभिनव आंदोलन सुरू केले आहे. येत्या २६ जानेवारीपर्यंत थोरातांना नगर जिल्ह्यातून अशी पत्रे पाठवली जाणार आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी केली असून त्या मागणीला मनसे नगर जिल्ह्याचा पाठिंबा आहे. ही मागणी जोर धरत असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला कॉंग्रेसचा विरोध आहे, अशी भूमिका घेतली असल्यामुळे जो छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करेल, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडणार नाही, असा इशारा नगर मनसेने दिला आहे. ज्या औरंगजेबाने संभाजी महाराजांचे हाल केले, त्या औरंगजेबाच्यामागे कॉंग्रेस तसेच हे महाविकास आघाडी सरकार राहत असेल तर यांना सत्तेत राहण्याचा कुठलाच अधिकार नाही. मतांच्या राजकारणासाठी जर कॉंग्रेस छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करीत असेल आणि तो विरोध नगर जिल्ह्यातील मंत्री बाळासाहेब थोरात करीत असतील तर मनसे शांत बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

हिन्दु धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे मंत्री बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात राहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे या मागणीला केलेला विरोध थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्यावतीने संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुहास दशरते यांनी 26 जानेवारीपर्यंत नामांतराचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत 5 जानेवारीपासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने 'छत्रपती संभाजी महाराज कि जय' असा जयघोष पोस्टकार्डवर लिहून जिल्ह्यातून दहा हजार पत्रे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरच्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे. असे पत्र पाठवण्याची सुरुवात मंगळवारी करण्यात आली. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, नितीन भुतारे, गजेन्द्र राशीनकर, अशोक दातरंगे, अॅड. अनिता दिघे, परेश पुरोहित, गणेश मराठे, संकेत व्यवहारे, अंबादास गोटीपामुल उपस्थित होते. यावेळी सर्वांनी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर व्हावे या मागणीला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले व सर्व हिंदु जनतेने या मोहिमेत सहभागी होऊन पाठिंबा देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post