चर्चा नामांतराची : जातीयवादी राजकारण खपवून घेणार नाही; 'राष्ट्रवादी'चा इशारा


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची भाषा करणारे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले, असा सवाल राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी उपस्थित केला असून, या नामांतराच्या निमित्ताने दोन समाजात दुही निर्माण करून जातीयवादी राजकारण केले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

अहमदनगरचे नाव बदलून ते अंबिकानगर करण्याची मागणी शिवसेनेचे शिर्डीचे खासदार लोखंडे यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर जहागीरदार यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले असून, त्यात त्यांनी खा. लोखंडेंवर टीका केली आहे. अहमद निजामशाहने अहमदनगर शहराची स्थापना केली. शहराला पाचशे वर्षापेक्षा जास्त कालावधीचा मोठा इतिहास आहे. अहमदशहाने हे शहर विकासात्मकदृष्टया इतके सुंदर बनवले होते की, कैरो-बगदादसारख्या शहरांशी अहमदनगरची तुलना होत असे. मात्र, मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून जिल्ह्याचे प्रश्‍न सोडविण्याचे ढोंग करणार्‍या लोकप्रतिनिधीला हा इतिहास माहीत नसणार. जिल्ह्यातील जनता सुज्ञ असून, अशा चुकीच्या राजकारणाला बळी पडणार नाही, असा विश्वासही जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे.

एका लोकप्रतिनिधीने बेरोजगारी, कोरोनाचे संकट, शेतकरी प्रश्‍न आदी ज्वलंत प्रश्‍न सोडून अशा पध्दतीने चुकीचे विधान करणे हास्यास्पद आहे. लोखंडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी काय योगदान दिले यावर बोलावे. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी करून त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे. पण शहराच्या नामांतरावरुन सुरु करण्यात आलेले जातीयवादी राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करून निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटकाळात कणखर भूमिका घेऊन राज्याला योग्य दिशा दिली. त्यांचा चेहरा व पक्ष पाहून नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत लोखंडे यांना दुसर्‍यांदा खासदार होण्याची संधी दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी शहराचे नाव बदलण्यावरुन कोणी राजकारण करु नये, असे बजावले असताना शिवसेनेचे खासदार यांनी हा चुकीचा मुद्दा उपस्थित करून दोन समाजात दुही निर्माण करण्याचे काम केले आहे. आपल्या मतदार संघात किती वेळ थांबून जनतेचे प्रश्‍न सोडविता, याचे उत्तर देखील त्यांनी द्यावे. नागरिकांची जिल्हा नामांतरची नव्हे तर विकासाची भावना असून खासदारांना ही भावना कशी कळली नाही? केंद्रात जाऊन खासदार लोखंडे भाजपची भाषा बोलू लागले असल्याचा आरोप जहागीरदार यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post