नाट्य परिषदेची नगरला आणखी एक शाखा; 'महानगर' शाखेला मान्यता


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेने "अहमदनगर महानगर" या नव्या शाखेला मान्यता दिली आहे. मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीने या मान्यतेचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नाट्य परिषदेच्या जिल्ह्यात चार शाखा झाल्या आहेत. नगर शहरात अहमदनगर शाखा, शेवगाव शाखा, संगमनेर शाखा आणि आता 'अहमदनगर महानगर' शाखा अशा या चार शाखांद्वारे हौशी नाट्य कलावंतांसाठी उपक्रमांचे नियोजन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीने अहमदनगर शहरात 'अहमदनगर महानगर' या नवीन शाखेस मान्यता दिली असून तसे पत्र मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी दिले आहे, अशी माहिती क्षीतिज झावरे यांनी दिली. नाट्य परिषदेच्या घटनेनुसार महापालिका क्षेत्रात ३ शाखांना कार्य करता येते, त्यामुळे या नियमानुसार नगर शहरातील अनेक युवा कलाकार, नाटय रसिक यांनी या शाखेसाठी मागणी केली होती. ती मध्यवर्ती शाखेने मान्य केली आहे.

नगर जिल्ह्यातील नाट्य चळवळ मागील अनेक वर्षांपासून बहरत आहे. राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गणपती व नवरात्रमधील व्यावसायिक नाट्य प्रयोग, विविध नाट्य प्रशिक्षण शिबिरे आणि नाट्य विषयक उपक्रमांबरोबरच चित्रपट निर्मिती, मालिका निर्मिती नगर शहरात होत आहे. या उपक्रमांमधून अनेक युवा कलाकार नगर शहरात निर्माण होत आहे. शहरातील रसिक वर्गसुद्धा वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील २२० नाटय रसिकांनी एकत्र येऊन या नव्या महानगर शाखेची मागणी केली होती. या मागणीला मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि मध्यवर्ती कार्यकारी समितीने मान्यता दिली. मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीच्या झालेल्या सभेनंतर अभय गोले यांच्या नावे हे मंजुरीचे पत्र संजय लोळगे यांना देण्यात आले. या नवीन शाखेची अस्थायी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच सर्व कार्यालयीन कामकाज पूर्ण करण्यात येईल आणि नूतन कार्यकारिणीची स्थापना करण्यात येईल. नगर शहरात नवीन शाखा मंजूर झाल्यामुळे अनेक नाट्यकर्मी, रसिक प्रेक्षक यांनी नूतन शाखा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post