भाई बार्शीकरांचा विकास वारसा जपण्यासाठी दबाव गट करू; कुलगुरु निमसे


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नगरचे राजकारण गढूळ झाले आहे, पण कोळसा कितीही उगाळला तरी काळाच राहतो. त्यामुळे अशा राजकारणापेक्षा नवनीतभाई बार्शीकरांनी रुजवलेल्या विकासपर्वाची पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी आपण नगरमध्ये एक सशक्त दबाव गट उभा करू, अशी ग्वाही निवृत्त कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी येथे दिली. दरम्यान, नगरचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष व नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष दिवंगत नवनीतभाई बार्शीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्तच्या उपक्रमांची सुरुवात बुधवारी झाली. भाईंच्या जीवनावर गौरवग्रंथ, भाईंनी उभ्या केलेल्या विकासकामांवर त्यांच्या नावाचे फलक, भाईंचा विकास विचार नव्या पिढीपर्यंत व युवा राजकारण्यांपर्यंत जाण्यासाठी जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.

नवनीत विचार मंचाचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार सुधीर मेहता यांच्या निवासस्थानी नवनीतभाई बार्शीकर यांच्या प्रतिमेस डॉ. निमसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाषशेठ मुथा, अमृत मुथा, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, मनसेचे सचिन डफळ, आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद शेख, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, जागरूक नागरिक मंचचे सुहासभाई मुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, जनार्दन शिरसाठ, कवयित्री डॉ. कमर सुरुर, श्रीमती बागडे, राजन नवले, महावीर पोखरणा, अबिद खान आदी उपस्थित होते.

प्रारंभी सुधीर मेहता यांनी भाईंच्या आठवणींना उजाळा दिला. जन्म शताब्दीनिमित्तच्या विविध उपक्रमांमध्ये नगरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. जन्मशताब्दी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. निमसे यांची निवडही त्यांनी जाहीर केली. भाईंनी उभ्या केलेल्या विकासकामांची तुलना नंतरच्या व आताच्या राजकारण्यांच्या विकास कामांशी होते. त्यामुळे अनेक विकासकामांवरील भाईंच्या नावांचे फलक पुसण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे भाईंची अशी उपेक्षा करणाऱ्या महापालिकेला आता नगरकर 'कृतघ्न महापालिका' पुरस्कार देणार आहे, असे मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील सर्व सामाजिक संस्था व संघटना एकत्र आल्यातर भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लालटाकीवरील नेहरू उद्यानाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नवनीतभाई विचारमंच पुढाकार घेईल, असेही त्यांनी जाहीर केले.

भाईंच्या आठवणींना उजाळा
या कार्यक्रमात नवनीतभाईंच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. सुभाष मुथा म्हणाले, आम्ही भाईंच्या बरोबर काम केले. तो काळ सुवर्णकाळ होता. किरण काळे म्हणाले, भाईंचे विचार शहरातील आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याची गरज आहे. जयंत येलुलकर म्हणाले, भाईंमध्येमध्ये रसिकता होती. त्यांनी केलेल्या विकास कामांच्यामधून ती प्रकर्षाने जाणवते. अर्शद शेख म्हणाले, शहराची दुरावस्था झाली आहे. प्रत्येक ठिकाणी पावलोपावली भाईंच्या कामाची आठवण नगरकरांना होत असते. भाईंना सगळे विकास पुरुष म्हणतात, पण भाई हे खऱ्याअर्थाने विकास पर्व होते. त्यांच्यानंतर नगरला काही झाले नाही, असे ते म्हणाले. अमृत मुथा म्हणाले, आज नगरहून तरुण पिढी नोकरीकरिता बाहेर जाते. त्याकाळात भाईंनी मला नगरला आणले आणि पालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी सोपवली. महत्त्वाची मोठी कामे आम्ही केली. आज मात्र नगरला तरुणांना रोजगार नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सुहासभाई मुळे म्हणाले, भाईंच्या रूपाने नगरला विकासपुरुष मिळाला. हे शहराचे भाग्य आहे. पण त्यांचे कार्य पुढे नेणारा विकास पुरुष झाला नाही. शहराची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची वज्रमूठ केली तर सगळे सरळ होतील, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह, जयशेठ मुनोत, सायली मेहता, कल्पना मेहता आदींनी केले. आभार श्रीराम जोशी यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post